जिवावर खेळून आमदार जोरगेवारांनी पकडली अवैध दारू, १ कोटीचा माल जप्त - mla seize illegal liquor good worth rs one crore | Politics Marathi News - Sarkarnama

जिवावर खेळून आमदार जोरगेवारांनी पकडली अवैध दारू, १ कोटीचा माल जप्त

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 20 जानेवारी 2021

6 वाहनांत एकूण 1700 ते 2 हजार पेटी देशी दारू होती. चारचाकी वाहने एकूण 1 कोटी रुपयांचा माल जप्त केला. केवळ चंद्रपूरच नव्हे, तर एकुणच पोलिस बंदोबस्तावर आमदारांच्या या कारवाईने प्रश्‍नचिन्ह लावले आहे.

चंद्रपूर : जिल्ह्यात दारूबंदी आहे. दारूबंदी उठवावी की नाही, याबाबत वेगवेगळे मतप्रवाह आहेत. पण अवैध धंदे करणाऱ्यांना याचा काही फरक पडत नाही. जिल्ह्यात दररोज सर्रास कोट्यवधी रुपयांची दारू आणली जाते. जागरूक आणि सक्रिय आमदार किशोर जोरगेवार यांनी काल रात्री शहरात सहा वाहनांतून येणारी दारू पकडली. दारू विक्रेत्यांकडून वारंवार धमक्या मिळाल्या असूनही त्यांनी कामगिरी केली. माझ्या क्षेत्रात अवैध धंदे चालणार नाही, असा इशारा त्यांनी दारू व्यावसायिकांना दिला आहे. 

नागपूर मार्गे शहरात 1 नाही, 2 नाही तर तब्बल 7 चारचाकी वाहनांचा ताफा दाखल होत होता. मात्र आमदार किशोर जोरगेवार यांनी जिवाची पर्वा न करता अवैध दारू विक्रेत्यांच्या वाहनांवर हल्लाबोल केला व 7 वाहने जप्त करून पडोली पोलीस ठाण्यात जमा केली. 7 वाहनांमध्ये 1 वाहन हे पायलट गाडी होती. त्याचं काम शहरात जाण्याचा मार्ग सुरळीत करून मागच्या वाहनांना सावधान करणे होते. 6 वाहनांत एकूण 1700 ते 2 हजार पेटी देशी दारू होती. चारचाकी वाहने एकूण 1 कोटी रुपयांचा माल जप्त केला. केवळ चंद्रपूरच नव्हे, तर एकुणच पोलिस बंदोबस्तावर आमदारांच्या या कारवाईने प्रश्‍नचिन्ह लावले आहे.

यावेळी पडोली पोलीस ठाण्यात आमदार जोरगेवार व त्यांच्या समर्थकांशिवाय चंद्रपूर जिल्ह्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे सुद्धा उपस्थित होते. सक्रिय, जागरूक लोकप्रतिनिधी असल्याचा परिचय देत आमदार जोरगेवार यांनी अवैध दारूचा व्यवसाय करणाऱ्यांना इशारा दिला आहे. माझ्या क्षेत्रात अवैध धंदे चालणार नाही म्हणजे नाही, असे त्यांना ठणकावून सांगितले. एकूण ९ वाहने होती आमच्या कारवाईत दोन वाहनचालक पळून गेले. त्यांना आम्ही पकडू शकलो नाही, असे आमदार जोरगेवारांनी सांगितले. 

जिल्ह्यातील दारूबंदी ही केवळ कागदापूरतीच मर्यादित असून आजही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारूचा व्यवसाय सर्रास सुरू आहे, मात्र या अवैध दारूवर नियंत्रण मिळविण्यास पोलीस प्रशासन अपयशी ठरले आहे. पोलीस आपले कर्तव्य बजावणार नाही तर सामान्य माणूस काय करणार, असा प्रश्न नेहमी जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांच्या बाबतीत उपस्थित होतो. काही महिन्यांपूर्वी आमदार जोरगेवार यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना सूचना केल्या होत्या की अवैध दारूची वाहतूक थांबवा माझ्या क्षेत्रात असे धंदे चालणार नाही. त्यानंतर आमदार जोरगेवार यांना अवैध दारू विक्रेत्यांकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या. त्यानंतरही त्यांनी काल रात्री चंद्रपुरात येणारी अवैध दारू पकडून पोलीस प्रशासनाचा ढिम्मपणा, निष्काळजीपणा उघडकीस आणला.  
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख