नितीन राऊतांची विधानसभा अध्यक्षपदी वर्णी शक्य, नानांना मिळणार ‘ऊर्जा’? - is it possible for nitin raut to beome a speaker of assembly will nana get energy | Politics Marathi News - Sarkarnama

नितीन राऊतांची विधानसभा अध्यक्षपदी वर्णी शक्य, नानांना मिळणार ‘ऊर्जा’?

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 18 मार्च 2021

क्षश्रेष्ठींनी संघटनेचे काम माझ्यावर सोपविले आहे आणि ते मी पूर्ण प्रामाणिकपणा आणि मेहनतीने करीत आहो. सध्या राज्यात जी स्थिती आहे, ती पाहता सध्या माझीच मंत्रिमंडळात जाण्याची इच्छा नाही. सध्या संघटन मजबूत करायचे आहे. पण श्रेष्ठी जो आदेश देतील, त्याचे प्रश्‍न न करता पालन करायचे आहे.

नागपूर : भंडारा जिल्ह्याच्या साकोली मतदारसंघाचे आमदार नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांना मंत्रिपद मिळणार, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यांना ‘ऊर्जावान’ खाते मिळणार, असेही सांगण्यात येत होते आणि आजही तेच सांगण्यात येते. विद्यमान ऊर्जामंत्र्यांची विधानसभा अध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता असल्याची माहिती आहे. त्यामुळे आमदार नाना पटोलेंना लवकरच ऊर्जामंत्रीपद मिळणार असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली आहे. 

राज्याच्या मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होण्याची शक्यता आहे. ऊर्जा खाते नानांना देण्यासाठी दिल्लीत बैठक असल्याचेही सूत्रांनी सांगितले. लवकरच हा निर्णय कॉंग्रेस हायकमांड घेतील, असेही सूत्र सांगतात. नानांना ऊर्जामंत्री बनवले तर मग डॉ. नितीन राऊत यांचे काय, याचे उत्तर शोधले जात आहे. दलितांचे प्रश्‍न प्राधान्याने सोडवायचे असतील तर त्यासाठी संवैधानिक पद असणे केव्हाही उत्तम. त्यामुळे डॉ. नितीन राऊत यांना विधानसभेच्या अध्यक्षपदी विराजमान केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. यासंदर्भात ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र होऊ शकला नाही.

हेही वाचा : भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटलांचे जावई गणेश माने देशमुख काँग्रेसमध्ये... 

ऊर्जामंत्रीपदाबाबत नाना पटोले यांना विचारणा केली असता, अशा कुठल्याही हालचाली सुरू असल्याच्या वृत्ताचा त्यांनी इन्कार केला. पक्षश्रेष्ठींनी संघटनेचे काम माझ्यावर सोपविले आहे आणि ते मी पूर्ण प्रामाणिकपणा आणि मेहनतीने करीत आहो. सध्या राज्यात जी स्थिती आहे, ती पाहता सध्या माझीच मंत्रिमंडळात जाण्याची इच्छा नाही. सध्या संघटन मजबूत करायचे आहे. पण श्रेष्ठी जो आदेश देतील, त्याचे प्रश्‍न न करता पालन करायचे आहे, असे नानांनी सांगितले. हे बोलत असताना मंत्रिपदाची त्याची सुप्त इच्छा लपून राहिली नाही. मात्र त्यांनी त्याला ‘पक्षश्रेष्ठी जो आदेश देतील’, असे उत्तर दिले. सूत्रांच्या माहितीनुसार, नाना पटोलेंचे ऊर्जामंत्रीपद पक्के असल्याचे मानले जात आहे. 

नाना पटोले विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन मोकळे झाले. त्यानंतर त्या पदाचा तिढा अद्याप सुटला नाही. तरी, नाना पटोलेंना मंत्रिपद हवे आहे. राजीनामा देताना त्यांना तशी ‘कमीटमेंट’ दिल्याची माहिती आहे. प्रदेशाध्यक्षाकडे मंत्रिपद असू नये, त्याने पूर्णवेळ पक्षसंघटना मजबूत करण्याचे काम करावे, असे मानणारा एक वर्ग पक्षात आहे. तर प्रदेशाध्यक्षाला कार्यकर्त्यांचे संघटन करताना राज्यभर फिरावे लागते. मेळावे, बैठका घ्याव्या लागतात. यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्‍यकता असते. त्यामुळे प्रदेशाध्यक्षाकडे मंत्रिपद आणि तेही ‘ऊर्जावान’ असावे, असे मानणारा दुसरा वर्ग आहे. या दुसऱ्या वर्गाचे पारडे जड पडणार, असे सद्यस्थितीत होत असलेल्या हालचालींवरून दिसतेय. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख