तेथे मुख्यमंत्र्यांनाही बोलायला शब्द फुटले नाहीत...

जिल्हा सामान्य रुग्णालयात लागलेली आग अत्यंत दुर्दैवी आहे. अशा प्रकारची घटना यापुढे घडणार नाही. यासाठी उपाययोजनांचा शोध घेताना ही आग कशामुळे लागली त्याची चौकशी करून दोषींविरुद्ध कठोर कारवाई करावी अशी सूचना विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
bha10p14
bha10p14

भंडारा : जिल्हा सामान्य रुग्णालयात शॉर्ट सर्किट होऊन शनिवारी पहाटे लागलेल्या आगीत १० नवजात बालकांचा मृत्यू झाला. त्यानंतर विदर्भातील जवळपास सर्वच मंत्र्यांनी भंडाऱ्याकडे धाव घेतली. काल रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भंडाऱ्याला भेट दिली. त्यानंतर त्यांनी मृत बालकांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. बालकांच्या आईने फोडलेला टाहो ऐकून काय बोलावे, हे क्षणभर मुख्यमंत्र्यांनाही सुचले नाही. 

राज्यातील सर्वसामान्य जनता शासकीय रुग्णालयात विश्वासाने येते. त्यांना चांगल्या दर्जाच्या आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे प्रशासनाचे कर्तव्य आहे. त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही, याची खबरदारी घेतानाच भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात घडलेली घटना यापुढे राज्यात कुठेही घडणार नाही. तसेच शासकीय यंत्रणेच्या अनास्थेमुळे एकही निष्पाप जिवाचा बळी जाता कामा नये. यासाठी सर्व रुग्णालयाचे फायर व इलेक्‍ट्रिकल ऑडिट सक्तीचे करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. भंडारा येथील जिल्हा रुग्णालयातील आग लागलेल्या शिशू केअर युनिटची पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. या घटनेमधून वाचविण्यात आलेल्या सात बालकांवर सुरू असलेल्या उपचाराची माहिती घेतली. तसेच त्यांच्या कुटुंबीयांसोबत संवाद साधला.

यावेळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, परिवहन मंत्री अनिल परब, पालकमंत्री डॉ. विश्वजित कदम, खासदार सुनील मेंढे, आमदार नरेंद्र भोंडेकर, राजू कारेमोरे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार, जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत जाधव, आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, भंडारा येथे घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असून तिच्या कारणांचा शोध घेण्यात येईल. राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर व इलेक्‍ट्रिकल ऑडिट सक्तीचे करण्यात येणार असून यंत्रसामग्री घेण्यासाठी आवश्‍यक निधी उपलब्ध करून दिल्या जाईल. या घटनेचे नेमके कारण शोधण्यासाठी तज्ञ व्यक्तींची मदत घेण्यात येणार आहे. ही घटना कुणाच्या दुर्लक्षामुळे घडली, तसेच भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी व्यवस्थेत असलेल्या उणिवा व त्रुटींची सर्वंकष चौकशी करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले. घटनेसंदर्भातील कारणांचा शोध घेतल्यानंतर राज्यातील सर्वच शासकीय रुग्णालयात आवश्‍यक यंत्रणा सज्ज करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

उपचारासाठी अडवू नका
पालकमंत्री डॉ. कदम यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील घटनेनंतर वाचलेल्या बालकांवर उपचारासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या कुटुंबांना संपूर्ण मदत दिली जात आहे. या घटनेनंतर रुग्णालय बंद राहणार नाही. तसेच ओपीडी नियमित सुरू राहील. यादृष्टीने उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. यासाठी पोलिस दलाची मदत करण्यात येत आहे. उपचारासाठी येणाऱ्या कोणालाही अडवू नका, असे निर्देशही देण्यात आले आहे.
शिशू केअर युनिटला आग लागल्याचे माहिती पडताच फायर एक्‍स्टींग्विशद्वारे आग विझविण्याचा प्रयत्न करणारे सुरक्षा रक्षक तसेच अग्निशमन दलाच्या जवानांसोबत मुख्यमंत्र्यांनी संवाद साधून त्यांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले.
प्रारंभी मुख्यमंत्र्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाला लागलेल्या आगीसंदर्भात संपूर्ण घटनाक्रमाची माहिती जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्याकडून घेतली. 

शिशू केअर युनिटला मध्यरात्री लागलेल्या आगीत आयसीयूमध्ये भरती असलेल्या दहा बालकांचा मृत्यू झाला तर, सात बालकांना वाचविणे शक्‍य झाले. आग विझविण्यासाठी सुरक्षा रक्षक व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रारंभी शर्तीचे प्रयत्न केले. त्यानंतर अग्निशमन विभाग तत्काळ घटनास्थळी पोहोचल्यामुळे आगीवर नियंत्रण शक्‍य झाले. सामान्य रुग्णालयातील डॉक्‍टर व परिचारिका यांनी तत्काळ बालकांना इतर वॉर्डात हलविले. तसेच नातेवाइकांना बालकांचे मृतदेह सुपूर्द करण्यात आले. तसेच सानुग्रह अनुदानाची रक्कम सुद्धा तत्काळ वितरित करण्यात आली. या संपूर्ण घटनेची चौकशी  
करण्याच्या दृष्टीने न्यायवैधक तज्ज्ञांची टिम, इलेक्‍ट्रिकल निरीक्षक, व्हीएनआयटी, राष्ट्रीय अग्निशमन अभियांत्रिकी महाविद्यालयाचे तज्ञ, विद्युत, सार्वजनिक बांधकाम आदी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. त्यांचा अहवाल लवकरच मिळणार आहे.

विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी
जिल्हा सामान्य रुग्णालयात घडलेल्या दुर्घटनेची संपूर्ण चौकशी नागपूरचे विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहे. या समितीमध्ये तज्ञ म्हणून मुंबई अग्निशमन विभागाचे प्रमुख पी. एस. रहांगडाले यांचा समावेश राहणार आहे. त्यासोबतच आरोग्य सेवा संचालक व इतर विभागांच्या तज्ञांचाही या समितीमध्ये समावेश असल्याचे माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. या समितीला आपला अहवाल तत्काळ देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. या समितीच्या अहवालानुसार आगीचे नेमके कारण शोधल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल. राज्यातील इतर रुग्णालयातही या समितीने सुचविलेल्या सूचना लागू करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

जिल्हा सामान्य रुग्णालयात लागलेली आग अत्यंत दुर्दैवी आहे. अशा प्रकारची घटना यापुढे घडणार नाही. यासाठी उपाययोजनांचा शोध घेताना ही आग कशामुळे लागली त्याची चौकशी करून दोषींविरुद्ध कठोर कारवाई करावी अशी सूचना विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली. जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या गरीब रुग्णांना नियमित उपचार सुरू राहावा तसेच जळीत वॉर्डाची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी सूचना केली.
Edited By : Atul Meher

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com