चौकशी अहवाल आला, त्या दुर्दैवी मातांचे काय ? - inquiry report submitted what about those unfortunate mothers | Politics Marathi News - Sarkarnama

चौकशी अहवाल आला, त्या दुर्दैवी मातांचे काय ?

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 20 जानेवारी 2021
आठ जानेवारीला मध्यरात्रीनंतर भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात ही घटना घडली होती. एकाचवेळी १० चिमुकल्यांचा मृत्यू झाल्यानंतर मातांचा आक्रोशाने रुग्णालयाच्या भिंतीनाही पाझर फुटला, त्या मातांचा हा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

नागपूर : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील शिशू कक्षाला लागलेल्या आगीत १० शिशूंचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापासून डझनभर मंत्री, अधिकारी, मानवाधिकार आयोगाच्या सदस्यांनी घटनास्थळाला भेटी दिल्या. आताशा चौकशीचा अहवाल सादर करण्यात आला आहे. शॉर्ट सर्किटमुळे घटना घडली, असे अहवालात असण्याची शक्यता वर्तविली गेली आहे. 

मुख्यमंत्री, राज्यपाल आणि येथे आलेल्या सर्व मंत्र्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. या घटनेला ११ दिवस उलटून गेले. प्राथमिक चौकशी अहवाल शासनाकडे सादर केला. मात्र घटनेतील दोषींवर मात्र अद्याप निलंबनाची कारवाई झाली नाही. बाळ गमावलेल्या त्या दुर्दैवी माता न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. कारवाईचा फास आवळण्यास उशीर का होत आहे, हे गूढ अद्यापही उकललेले नाही.  

नवजात शिशूंचा आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या या प्रकरणात प्राथमिक जबाबदारी असलेले जिल्हा शल्यचिकित्सक, रात्रपाळीत कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी, परिचारिका यांच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई होणे अपेक्षित होते. कारवाईनंतर चौकशी करण्यात येईल, अशी अपेक्षा या सरकारकडून होती, मात्र तसे झाले नाही. तर अहवाल सादर झाल्यानंतर ज्या संबंधितांवर ठपका ठेवण्यात आला आहे, त्याच्यावर कारवाई करण्यात आली नाही. कारवाईला उशीर का होत आहे, हेच कळायला मार्ग नाही. अशा दुर्दैवी घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी तत्काळ चौकशी समिती तयार करण्यात आली, मात्र कारवाईला विलंब होत असल्याने या प्रकरणातील गंभीरता संपली की काय, असा प्रश्‍न उपस्थित होतो आहे. चौकशी समितीकडून दोषींवरील कारवाई पेक्षा उपाययोजना सांगण्यावर भर देण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

त्या मातांचा आक्रोश... 
आठ जानेवारीला मध्यरात्रीनंतर भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात ही घटना घडली होती. एकाचवेळी १० चिमुकल्यांचा मृत्यू झाल्यानंतर मातांचा आक्रोशाने रुग्णालयाच्या भिंतीनाही पाझर फुटला, त्या मातांचा हा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. त्या मातांचे सांत्वन करण्यासाठी सरकार तेथे आले, मात्र अद्याप या बाळ गमावलेल्या दुर्दैवी माता न्यायापासून वंचित आहेत. जणूकाही घडलेच नाही, असे चित्र येथे असून जिल्हा शल्यचिकित्सक असो, वैद्यकीय अधिकारी असो की, परिचारिका सारे व्यवहार सामान्यपणे सुरू आहेत.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख