अशोक चव्हाण यांच्या अंगावर फेकली शाई, अन् चतुर्वेदी झाले होते निलंबित... - ink thrown on ashok chavan then chaturvedi was suspended | Politics Marathi News - Sarkarnama

अशोक चव्हाण यांच्या अंगावर फेकली शाई, अन् चतुर्वेदी झाले होते निलंबित...

राजेश चरपे
बुधवार, 31 मार्च 2021

नागपूर शहर काँग्रेसवर विकास ठाकरे यांचे वर्चस्व आहे. त्यांच्याकडे कार्यकर्त्यांचा मोठा फौजफाटा आहे. त्यांना डावलणे सोपे नाही. मात्र ते आता आमदार आहेत. त्यामुळे नव्या नेतृत्‍वावर शहराची जबाबदारी सोपवावी, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. असे असले तरी सर्वांना चालणारा अध्यक्षपदाचा उमेदवार कोण, असा प्रश्न उपस्थित केला असता कोणीच कोणाचे नाव घ्यायला तयार नाही.

नागपूर : चार वर्षांपूर्वी महानगरपालिकेच्या मागिल निवडणुकीच्या वेळी शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी डॉ. नितीन राऊत आणि सतीष चतुर्वेदी यांच्या समर्थकांना कार्यकारिणीतून डावलले होते. याची तक्रार कार्यकर्त्यांनी तत्कालिन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे केली होती. पण त्यांनी काहीच न केल्यामुळे कार्यकर्त्यांनी तेव्हा हसनबाग येथे जाहिर सभेत त्यांच्यावर शाई फेकली होती. या घटनेला जबाबदार धरुन सतीष चतुर्वेदी यांनी निलंबित करण्यात आले होते.  

आमदार विकास ठाकरे सध्या शहराध्यक्ष आहेत. अध्यक्ष झाल्यानंतर ठाकरे यांनी तयार केलेल्या कार्यकारिणीवरून चांगलाच वाद निर्माण झाला होता. पालकमंत्री नितीन राऊत, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांच्या समर्थकांना कार्यकारिणीतून डावलण्यात आले होते. हा वाद तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यापर्यंत पोहचला होता. मात्र त्यांनी ‘जैस थे’ ची भूमिका घेतली. त्यामुळे नाराजी आणखीच वाढली. शेवटी महापालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान मोठे वादळ शहरात निर्माण झाले. चव्हाण यांना कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. हसनबाग येथील जाहीर सभेत त्यांच्यावर शाई फेकण्यात आली होती. त्यामुळे सतीश चतुर्वेदी यांना निलंबित करण्यात आले होते. या सर्व घडामोडींना चार वर्षे होत आली आहेत.
 
पुढील वर्षी होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीपूर्वी काँग्रेस शहराचा अध्यक्ष बदलणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सर्वच जिल्ह्यांत नवीन कार्यकारिणी स्थापन करण्यास सुरुवात केली आहे. येत्या महिन्यात नागपूरच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार असून अध्यक्षपदासाठी संभाव्य नावांची चाचपणी करण्यात येणार असल्याचे समजते. 

महापालिका निवडणुकीसाठी कार्यकर्ते सक्रिय होऊ लागले आहेत. प्रत्येकजण आपआपल्या गटात कार्यरत आहे. तिकीट मिळेल याची कोणालाच शाश्वती नाही. त्यामुळे प्रत्येकजण सावध पाऊल टाकत आहे. अनेकजण गटबाजीचा ठप्पा लागू नये म्हणून शांत बसला आहे. नाना पटोले यांनी लवकरात लवकर बैठक घेऊन नवीन कार्यकारिणी स्थापन केल्यास मोकळेपणा आणि उघडपणे काम करता येईल, अशी त्यांची भावना आहे. 

हेही वाचा : दीपाली चव्हाण यांना ॲट्रॉसिटीच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्यात आले होते

जबाबदारी कोण घेणार ? 
नागपूर शहर काँग्रेसवर विकास ठाकरे यांचे वर्चस्व आहे. त्यांच्याकडे कार्यकर्त्यांचा मोठा फौजफाटा आहे. त्यांना डावलणे सोपे नाही. मात्र ते आता आमदार आहेत. त्यामुळे नव्या नेतृत्‍वावर शहराची जबाबदारी सोपवावी, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. असे असले तरी सर्वांना चालणारा अध्यक्षपदाचा उमेदवार कोण, असा प्रश्न उपस्थित केला असता कोणीच कोणाचे नाव घ्यायला तयार नाही. त्यामुळे पेच वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नागपुरातील ही स्थिती कशी हाताळतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख