इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या की, प्रणवदांच्या तोंडातून निघतो फक्त धूर...

नागपुरातील रेशीमबाग मैदानावर संघाच्या महोत्सवात प्रणवदा प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. राष्ट्रवाद त्यांच्या भाषणाचा गाभा होता. तेव्हा ते म्हणाले होते की, असहिष्णू म्हणून राजकारणाकडे पाहू नये, आपली दृष्टी वैविधता आणि बहुआयामिकता ठेवणारी असली पाहिजे.
Indira Gandhi - Pranav Mukharji
Indira Gandhi - Pranav Mukharji

नागपूर : दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी तल्लख बुद्धिमत्तेचे होते आणि आपल्या कामाची छाप पाडण्याची त्यांची हातोटी होती. त्यांना पाईप ओढण्याची सवय होती. एक वेळ पत्रकारांना इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या की, प्रणवदांच्या तोंडून कोणतीही गोष्ट काढणे फार अवघड. कारण त्यांच्या तोंडून केवळ धूर निघतो. तेव्हा धुरासोबत गोष्टी जरी नाही, पण खूप काही बाहेर निघते, असे उत्तर त्यावेळी प्रणवदांनी दिले होते, असे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज सभागृहात शोक प्रस्तावावर बोलताना म्हणाले. 

फडणविस म्हणाले, प्रणवदा चालता बोलता संदर्भग्रंथ होते. देशाची वेगवेगळी मंत्रिपदं त्यांनी सांभाळली. अनेक पक्षांमधल्या लोकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. अनेक जण नेहमी त्यांचा सल्ला घेत, देशासाठी आणि पक्षासाठी संकटमोचक म्हणून त्यांनी काम केलं आहे. तल्लख बुद्धिमत्ता, अस्खलित भाषा, मोजूनमापून बोलणे आणि छाप पाडण्याची त्यांची हातोटी होती. कॉंग्रेसचे प्रचारप्रमुख म्हणून चार राज्यांत त्यांनी काम केले. राज्यघटनेचे जतन आणि राष्ट्राचा विकास त्यांचे आवडते विषय होते. इंदिराजींनी त्यांच्यातले गुण हेरले आणि त्यांना राष्ट्रीय राजकारणात आणले. इंदिराजींनी त्यांच्यावर सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यांनी चोख पार पाडली. कॉंग्रेसमध्ये १९७० राज्यसभेवर निवडून आले त्यानंतर १९७५, १९८१, १९९३  आणि १९९९ मध्ये ते राज्यसभेवर निवडून गेले. 

पश्‍चिम बंगालमधून जांगीरपूर लोकसभा मतदारसंघातून ते निवडून आले. १९७३ ते १९७५ या काळात परिवहन उद्योग राज्यमंत्री, महसूल, स्टील, वाणिज्य अर्थमंत्री आणि विविध मंत्रिगटांचे अध्यक्ष ते राहिले. संसदेच्या इतिहासात सर्वाधिक म्हणजे ४० मंत्रिगटाचे अध्यक्ष राहण्याचा विक्रम त्यांनी केला. संकटकाळात मार्ग काढणारे संकट मोचक ते होते. विज्ञान तंत्रज्ञान परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही प्रणवदांनी जबाबदारी सांभाळली. इंदिराजींच्या मृत्यूनंतर पक्षाच्या अध्यक्षपदाची समस्या निर्माण झाली. ते वरिष्ठ होते, पण राजीवजींकडे नेतृत्व येणार होते. त्यामुळे त्यांना पश्‍चिम बंगालला पाठवण्यात आले. त्यानंतर नाराज झालेल्या प्रणवदांनी १९८६ मध्ये राष्ट्रीय समाजवादी कॉंग्रेसची स्थापना केली. नंतरच्या काळात त्यांनी आपला पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन केला. 

त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान नरसिंहराव यांनी त्यांना योजना आयोगाचा अध्यक्ष केलं. सोनियाजींनी राजकारणात यावं, म्हणून आग्रही असणाऱ्यांमध्ये प्रणवदांचा समावेश होता. सोनियांनी पंतप्रधानपदासाठी त्यांना मान्यता दिली होती. तेव्हा मनमोहन सिंग आणि प्रणवदांचं नाव चर्चेत होते. पण मनमोहनसींग यांचे नाव अखेर पक्के झाले. त्यानंतर मात्र ते पंतप्रधान होऊ शकले नाही. उपयुक्त उमेदवार असतानाही तो मान त्यांना मिळाला नाही. त्यांचे मोठं वैशिष्ट्य़ म्हणजे दरवर्षी नवरात्रीला ते घरी जायचे. ९ दिवस निष्ठेने पूजापाठ करायचे. संस्कृतवर त्यांची पकड होती. एकदा सभागृहात प्रमोद महाजन यांनी श्‍लोक म्हटला. तेव्हा प्रणवदा उभे राहिले. त्यांना श्‍लोकातील चूक सांगितली. त्यावर प्रमोदजी त्यांना उत्तर देत होते. तेव्हाच अटलजी उभे झाले आणि ‘प्रणवदांनी जर तुम्हाला सांगितले, तर ते प्रमाण मानायचं आणि पुढे बोलायचे नाही, असं त्यांना सांगितले. प्रमोद महाजनांनी तत्काळ त्यांचं ऐकले. इतका गाढा त्यांचा संस्कृतचा अभ्यास होता. 

भाजपसोबत प्रणवदांचं अतूट नातं होतं, अटलजींवर त्यांचे विशेष प्रेम होते. मोदींसोबतही त्यांचं वेगळ नातं होतं. अतिशय वेगळ्या प्रकारचं हे नातं होतं. २०१४ च्या निवडणुकीत मोदींनी भरपूर परिश्रम घेतले. प्रचार संपत आला होता. तेव्हा प्रणवदांनी त्यांना फोन केला, विचारपूस केली आणि तब्येतीची काळजी घेतली पाहिजे, असे मोदींना सांगितलं. खरं तर आवश्यकता नव्हती पण त्यांच्यातील ऋणानुबंधामुळे त्यांनी ते केलं. पित्याच्या ठिकाणी मोदींनी त्यांच्याकडे बघितलं आहे. त्यांना पाईप ओढण्याची सवय होती. त्यांना शेकडो पाईप मिळाले होते. यांतून त्यांनी ५०० पाईप भेट दिले, असल्याचे फडणवीस म्हणाले.  

नागपुरातील रेशीमबाग मैदानावर संघाच्या महोत्सवात प्रणवदा प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. राष्ट्रवाद त्यांच्या भाषणाचा गाभा होता. तेव्हा ते म्हणाले होते की, असहिष्णू म्हणून राजकारणाकडे पाहू नये, आपली दृष्टी वैविधता आणि बहुआयामिकता ठेवणारी असली  पाहिजे, असा मौलिक संदेश त्यांनी दिला होता. सार्कच्या मंत्रिपदाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते. आर्थिक दुरदर्शीता राखण्याचा प्रयत्न त्यांनी नेहमी केला. त्यांना वाचनाची विलक्षण आवड होती. राष्ट्रीय पातळीवर विविध जबाबदाऱ्या सांभाळूनही १५ पुस्तकांचं लेखन केले. त्यांना मॅन ऑफ ऑल सिझन समजलं जायचं. २००७ मध्ये पद्मविभूषण पुरस्कार मिळाला. लैंगिक अत्याचार कायद्यातली दुरुस्ती त्यांच्यामुळेच झाली. २५ दयेचे अर्ज त्यांनी फेटाळले. यामध्ये याकुब मेनन, अफजल गुरू आणि अजमल कसाब यांचा त्यात समावेश होता. ते रोज डायरी लिहायचे ५० वर्ष त्यांनी डायरी लिहिली. मी गेल्यानंतर ती प्रसिद्ध करायला ते सांगून गेले. ती डायरी प्रसिद्ध झाल्यावर अनेक गोष्टी आपल्याला कळतील, असे फडणवीस म्हणाले. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com