‘असे’ असेल तर मी खासदार नवनीत राणा यांच्यासोबत उभा राहीन ! - if it was happend then i will stand with mp navnit rana | Politics Marathi News - Sarkarnama

‘असे’ असेल तर मी खासदार नवनीत राणा यांच्यासोबत उभा राहीन !

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 23 मार्च 2021

काही लोकांना असे कौशल्य अवगत असते की ते राईचा पहाड करतात आणि त्यातून प्रसिद्धी मिळवतात. खासदार राणा त्यांतीलच एक आहेत. गेल्या एक दीड वर्षातील त्यांचा कार्यकाळ पाहता ही बाब कुणाच्याही लक्षात येऊ शकते. राहिली गोष्ट त्यांना पत्र पाठवून चेहऱ्यावर ॲसीड फेकण्याची धमकी देण्याची, तर हे काम आम्ही करू शकत नाही.

नागपूर : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी माझ्यावर आरोप केला आहे की मी त्यांना धमकी दिली, तो धादांत खोटा आहे. आयुष्यात मी कुणाला धमकावले नाही आणि महिलांना धमकी देण्याचा तर प्रश्‍नच येत नाही कारण मी एक शिवसैनिक आहे. असे काम करूच शकत नाही. उलट खासदार नवनीत राणाच सर्वांना धमकावत असतात. संसदेतही त्यांच्या देहबोलीवरून हे लक्षात येते. त्यांनी केलेला आरोप धादांत खोटा आहे, असे शिवसेनेचे दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत म्हणाले. राहिली गोष्ट त्यांना पत्र पाठवून चेहऱ्यावर ॲसीड फेकण्याची धमकी देण्याची, तर ज्यांनी कुणी हे काम केले असेल, त्यांचा मी निषेध करतो आणि तसे घडले जर असेल तर मी खासदार नवनीत राणा यांच्या सोबत उभा राहीन, असेही ते म्हणाले. 

काल संसद भवनच्या लॉबीमध्ये खासदार सावंत यांनी चालत आपल्या बाजूने जाताना तू महाराष्ट्रात कशी फिरते, ते पाहून घेऊ, तुला जेलमध्येच टाकू.’, अशी धमकी दिल्याचा आरोप खासदार राणा यांनी खासदार सावंत यांच्यावर केला. तशी तक्रारही त्यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे केली आहे. याबाबत बोलताना अरविंद सावंत म्हणाले, खासदार राणा यांनी केलेला आरोप धादांत खोटा आहे. संसदेत जेव्हाही त्या महाराष्ट्राच्या बाबतीत बोलतात, त्यांच्या बोलण्यात आणि एकंदरीत देहबोलीवरून लक्षात येते की, त्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा तिरस्कार करतात. मी आयुष्यात कुणाला धमकावलेले नाही आणि महिलांना तर नाहीच नाही. महाराष्ट्रातील सरकार बरखास्त करण्यासाठी भाजपचे सर्वच खासदार उतावीळ असतात आणि अध्यक्षांकडून त्यांना तशी परवानगीही दिली जाते. 

भाजपचेच खासदार धमकी आणि चुकीची भाषा वापरतात. मी त्यांच्या बाजूने जाताना त्यांना धमकी दिली असेल तर त्यांच्या आजूबाजूच्या कुणीतरी किंवा माझ्या जवळपास असलेल्या कुणीतरी त ते ऐकले असेल ना. नवनीत जेथून खासदार म्हणून निवडून आल्या आहेत, तेथे त्यांच्या आधी आमचे आनंदराव अडसुळ खासदार होते. त्यांनी राणांच्या विरोधात त्याच्या जात प्रमाणपत्राच्या बाबतीत न्यायालयात प्रकरण दाखल केले आहे. त्यामुळे त्या नेहमी शिवसेनेच्या विरोधात तलवार उपसूनच असतात. त्यामुळे त्या जेव्हाही बोलायला तोंड उघडतात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विरोधात काही बाही बरळत असतात. याबाबत मी त्यांना समजावले पण आहे, की तुम्ही अशा प्रकारे वैयक्तिक पातळीवर टिका करत जाऊ नका. सभागृहातही कुणाचे नाव घेऊन बोलले तर मनाई केली जाते. पण राणा नाव घेऊन आरोप करतात. त्यामुळे ते रेकॉर्डवर येते.

हेही वाचा ः सत्तेसाठी विरोधी पक्ष किती उतावीळ झालाय..रोहित पवारांची भाजपवर टीका

काही लोकांना असे कौशल्य अवगत असते की ते राईचा पहाड करतात आणि त्यातून प्रसिद्धी मिळवतात. खासदार राणा त्यांतीलच एक आहेत. गेल्या एक दीड वर्षातील त्यांचा कार्यकाळ पाहता ही बाब कुणाच्याही लक्षात येऊ शकते. राहिली गोष्ट त्यांना पत्र पाठवून चेहऱ्यावर ॲसीड फेकण्याची धमकी देण्याची, तर हे काम आम्ही करू शकत नाही. कोणताही शिवसैनिक हे काम करू शकत नाही. ज्यांनी कुणी हे काम केले असेल, त्यांचा मी निषेध करतो आणि तसे घडले जर असेल तर मी खासदार नवनीत राणा यांच्या सोबत उभा राहीन, असे खासदार अरविंद सावंत म्हणाले. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख