बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचा जीआर नागपुरात जाळला.... - gr named of balasaheb thackeray burnt in nagpur | Politics Marathi News - Sarkarnama

बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचा जीआर नागपुरात जाळला....

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 20 जानेवारी 2021

बाळासाहेब ठाकरे विदर्भ विरोधी होते. वेगळा विदर्भ देण्यास त्यांचा विरोध होता. म्हणून विदर्भातील प्राणी संग्रहालयाला विदर्भातील दुसऱ्या कोणत्याही नेत्याचे नाव दिले तरी चालेल. परंतु विदर्भ विरोधी नेत्याचे नाव नको.

नागपूर : शहरानजीक असलेल्या गोरेवाडा उद्यानाला ‘बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय’, असे नाव देण्यात आले. येत्या मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः या प्राणी संग्रहालयाचे उद्धाटन करणार आहेत. पण विदर्भविरोधी राहिलेल्या बाळासाहेब ठाकरेंचे नाव गोरेवाड्याला देऊ नये, असे म्हणत विदर्भवाद्यांनी ‘तो’ जीआर जाळून निषेध केला. 

बाळासाहेब ठाकरे विदर्भ विरोधी होते. वेगळा विदर्भ देण्यास त्यांचा विरोध होता. म्हणून विदर्भातील प्राणी संग्रहालयाला विदर्भातील दुसऱ्या कोणत्याही नेत्याचे नाव दिले तरी चालेल. परंतु विदर्भ विरोधी नेत्याचे नाव नको, अशी भूमिका घेत विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या युवा आघाडीतर्फे जीआर जाळून निषेध करण्यात आला. युवा आघाडी अध्यक्ष मुकेश मासुरकर यांच्या नेतृत्वात गिरीपेठ येथील समितीच्या मुख्य कार्यालय परिसरात झालेल्या या आंदोलनाला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नागपूर जवळ गोरेवाडा येथे साकारण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानात जनतेला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटन सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने प्रकल्प आराखडा बनविण्यात आला आहे. गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान हे व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र वनविकास महामंडळ, नागपूर यांच्या अखत्यारीत असून तेथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सफारी व सुविधा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू आहे. जवळपास 2 हजार हेक्टर वन क्षेत्रावर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राणी उद्यान साकारण्यात येत असून यामधील महत्त्वाची कामे महाराष्ट्र वनविकास महामंडळ, नागपूर यांच्याकडून  पूर्ण करण्यात आलेली असल्याची माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी काल दिली होती. आज विदर्भवाद्यांनी जीआर जाळला. त्यामुळे २६ जानेवारीला होणाऱ्या कार्यक्रमाच्या वेळीही विरोध प्रदर्शन होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख