राज्यपाल म्हणाले ही घटना क्लेषदायक, कुटुंबीयांना दिली दोन लाखाची मदत

सात बालकांना आगीतून सुरक्षितपणे वाचविण्यात आले. वाचलेल्या बालकांच्या कक्षाला राज्यपाल कोश्यारी यांनी भेट देऊन शिशूंच्या मातांसोबत संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची आस्थेवाईकपणे चौकशी केली.
Bhagatsingh Koshyari at Bhandara
Bhagatsingh Koshyari at Bhandara

भंडारा :  येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाला लागलेल्या आगीत दहा बालकांचा झालेला मृत्यू अत्यंत क्लेशदायक आहे. अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडू नये, यासाठी खबरदारीच्या उपाययोजना तात्काळ लागू कराव्या, असे निर्देश देतानाच प्रत्येक मृत बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत देण्यात येईल, असे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथील सामान्य रुग्णालयाच्या पाहणीनंतर सांगितले. 

राज्यपाल कोश्यारी यांनी आज जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट दिली. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घडलेल्या घटनेसंदर्भात माहिती घेतली. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, खासदार सुनील मेंढे, आमदार परिणय फुके, नरेंद्र भोंडेकर, राजू कारेमोरे, जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा पोलीस अधिक्षक वसंत जाधव आदी उपस्थित होते.  
गेल्या शनिवारी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता कक्षाला लागलेल्या आगीत दहा बालकांचा मृत्यू झाला होता.  

सात बालकांना आगीतून सुरक्षितपणे वाचविण्यात आले. वाचलेल्या बालकांच्या कक्षाला राज्यपाल कोश्यारी यांनी भेट देऊन शिशूंच्या मातांसोबत संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची आस्थेवाईकपणे चौकशी केली. बालक व मातांची योग्य काळजी घेण्याची सूचना यावेळी त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना केली. त्यानंतर दुर्घटनाग्रस्त आयसीयू कक्षाला भेट दिली. ही पाहणी केल्यानंतर कोश्यारी यांनी या घटनेत मृत पावलेल्या प्रत्येक बालकाच्या कुटुंबीयांना स्वेच्छानिधीतून दोन लाख रुपये मदत देण्यासंदर्भात सूचना दिल्या.

तत्पूर्वी सकाळी येथील विश्रामगृहावर राज्यपालांचे आगमन झाले. त्यांनी जिल्हाधिकारी संदीप कदम व जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांच्याकडून त्यांनी रुग्णालयातील आगीच्या घटनेसंदर्भात सविस्तर माहिती घेतली. विविध संस्था व संघटनांच्या प्रतिनिधींनी यावेळी  राज्यपालांना भेटून या घटनेसंदर्भात निवेदन दिले.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com