भंडारा : शनिवारी पहाटे येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आग लागून १० नवजात शिशू होरपळून, गुदमरून मरण पावले. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज भंडाऱ्याचा दौरा केला. त्यांनी रुग्णालयाची पाहणी करून सर्व माहिती आणि घटनाक्रम जाणून घेतला. आगीतून बचावलेल्या बाळांच्या पालकांशी त्यांनी बातचीत केली.
रुग्णालयाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चर्चा करून राज्यपालांनी त्या दिवशीचा घटनाक्रम जाणून घेतला. जेथे आग लागली होती, त्या वार्डाची पाहणी केली आणि आवश्यक त्या सूचना दिल्या. गेल्या चार दिवसांत येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री विश्वजित कदम, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह इतरही मंत्र्यांनी भेटी देऊन पीडितांचे सांत्वन केले. आज राज्यपालांसोबत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि खासदार सुनील मेंढे होते.
जिल्हा रुग्णालयात झालेल्या अग्निकांडाचे पडसाद देशभर उमटले. त्यानंतर आरोग्य व्यवस्थेवर अनेक प्रश्नचिन्ह उभे राहिले. आरोप-प्रत्यारोप, सूचना, गाऱ्हाणी आदी झाले. त्यानंतर सरकारने तातडीने काही निर्णय घेतले. स्पष्ट निष्कर्ष अद्याप काढण्यात आले नसले तरी तथ्यशोधन समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती आज भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. ही घटना घडण्यामागे कारणे काय याचा शोध घेण्यासाठी वकील, डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक आदी तथ्य शोधण्यासाठी गेले आहेत. त्यांचा अहवाल ते सरकारला सादर करणार आहेत. हा अहवाल उद्यापर्यंत येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
आजच्या दौऱ्यात राज्यपालांनी माध्यमांशी बातचीत केली नाही. पाहणी करून ते नागपूरकडे रवाना झाले. ते तीन दिवस विदर्भात असल्याची माहिती आहे. उद्या पोद्दारेश्वर राम मंदिरात ते आरतीला उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर शुक्रवारी दुपारी दीड वाजता राज्यपाल रामटेक येथे कवी कुलगुरू कालीदास संस्कृत विद्यापीठात आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
Edited By : Atul Mehere

