भंडारा : चार दिवसांपूर्वी जिल्हा सामान्य रुग्णालयात शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत १० नवजात बाळांचा मृत्यू झाला. त्यानंतर डझनभर मंत्री येथे येऊन गेले. विविध सूचना केल्या, चौकश्या लावल्या. पण हे रुग्णालय आणि येथे दाखल रुग्णांच्या सुरक्षेची अजूनही पूर्ण काळजी घेतली जात नाहीये. रुग्णालयावर मृत्युचे आणखी एक वादळ घोंघावत आहे. त्याकडे कुणाचेही लक्ष गेले नाही. हे वादळ म्हणजे मधमाश्यांचा भला मोठा पोळ.
रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक आठच्या खिडकीजवळ भला मोठा मधमाश्यांचा पोळ आहे. या पोळातील मधमाश्या वॉर्डातसुद्धा येतात. रुग्णांच्या काही नातेवाइकांना या माश्या चावल्यादेखील आहेत. रुग्णांच्या नातेवाइकांनी याबाबत तक्रारीदेखील केल्या. पण प्रशासनाने त्यावर खबरदारी म्हणून कोणतीही उपाययोजना केली नाही. या एका पोळामध्ये हजारो मधमाश्या आहेत. नशीब, की हा पोळ अजून फुटला नाही. पोळ फुटला तर सर्वप्रथम या वॉर्डातील रुग्णांच्या जिवाला धोका आहे. त्यानंतर इतर लोकांवरही मधमाश्यांचा हल्ला होऊन पुन्हा ९ जानेवारीसारखी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
रुग्णालयातील जळीतकांडानंतर राज्याच्या मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, पालकमंत्र्यांसह डझनभर मंत्र्यांनी येथे भेटी दिल्या. पाहणी केली, आढावा घेतला, सूचना केल्या, चौकश्या लावल्या पण जिल्हा, राज्यच नव्हे तर देशाला हादरवून सोडणारी घटना घडल्यानंतरही हे रुग्णालय आता तरी लोकांच्या जिवासाठी सुरक्षित आहे का, याबाबत कुणीही विचार केलेला दिसत नाही. ९ जानेवारीसारखी दुर्घटना पुन्हा घडल्यास जबाबदार कुणाला धरायचे, याचे उत्तर आज तरी कुणाजवळ नाही. जीवघेण्या मधमाश्यांचा पोळ आहे, हे रुग्णांच्या नातेवाइकांनी लक्षात आणून देताच तो पोळ तेथून सुरक्षितपणे काढणे गरजेचे होते. पण प्रशासनाने काहीही केले नाही.
आग्या मोहोळ सर्वाधिक खतरनाक
आग्या मोहोळ म्हटले की भल्याभल्यांची घाबरगुंडी उडते. कारण एका पोळामध्ये हजारो माश्या असतात. पोळ फुटल्यानंतर त्या दिसेल त्यावर हल्ला करत सुटतात. या मधमाश्यांच्या वाचणे म्हणजे पुनर्जन्मच, असे बोलले जाते. पोळ फुटल्यावर पळायचा प्रयत्न केल्यावरही दोन-दोन किलोमीटरपर्यंत त्या पाठलाग करतात, असे रुग्णालयातील एका रुग्णाच्या नातेवाइकाने सांगितले.
Edited By : Atul Mehere

