लेकीचा चेहराही बघायला मिळू नये, इतका का अभागी मी? - even could not see daughters face why i am so unlucky | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

लेकीचा चेहराही बघायला मिळू नये, इतका का अभागी मी?

केवल जीवनतारे
सोमवार, 11 जानेवारी 2021

अनेक मातांनी काही क्षण बोलण्याचेही टाळले. मात्र, त्यांना समजावल्यानंतर मात्र या मातांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. या साऱ्या मातांचा रोष रुग्णालयातील परिचारिका आणि डॉक्टरांवर होता. 

नागपूर : गरिबांच्या फाटक्या संसारात आनंद घेऊन आलेल्या १० कोवळ्या जीवांना रूग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे जीव गमवावा लागला. चूक कुणाची, नुकसान किती, भरपाई दिली, या गोष्‍टींना आता  काहीही अर्थ उरला नाही. गेलेले जीव आता पुन्हा यायचे नाहीत. आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलेल्या नवजात बाळांचे मायबाप नुसता टाहो फोडत आहेत. यांपैकी मोहन सिडाम यांनी तर मुलीचा चेहराही बघितला नाही. ‘लेकीचा चेहराही बघायला मिळू नये, इतका का अभागी मी?, असा प्रश्‍न करीत मोहन नुसते अश्रू गाळत होते.  

‘‘आमच्या रंजल्या-गांजल्यांच्या तुटक्या-फुटक्या संसारात आनंद घेऊन आलेल्या कोवळ्या जीवांना फुलण्यापूर्वीच रुग्णालयाच्या बेजबाबदारपणामुळे अग्नी देण्याचा वेळ आमच्यावर आली. हातावर आणणं अन् पानावर खाणं, असं जिणं असते आमचं. आमी दरिद्री. पैसा नाही, म्हून सरकारी रुग्णालयात येतो, पर येथी गरिबायच्या जिंदगीची किंमत नाही. गरिबायनं मेलं काय न जगलं काय, यायले काही देणं-घेणं नाही’’, या भावना व्यक्त करतानाच रावणवाडी येथील वंदनाच्या लेकीचा लेकीचा चेहरादेखील बापाला बघता आला नाही. अभागी बाप मोहन सिडाम भंडारा येथे रात्री पोहोचला. हे सांगताना त्या मातेच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू गालावर आले. बाळ गमावणाऱ्या कुटुंबांनी येथील रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिकांचा बेजबाबदारपणा कथन केला. हातात पैसाचा कागुद दिला, पन आमची लेक तर गेली. आमचं बाळ तर गेलं. मात्र, यापुढे इतर माता आमच्यासारख्या दुर्दैवी ठरू नये, हा सूर या माताच्या वेदनांतून व्यक्त झाला. 

भंडारा जिल्हा रुग्णालयात दगावलेल्या कुटुंबांच्या घरी भेट दिली असता, टोलीतील हिरकन्या हिरालाल भानारकर, श्रीनगर पहेला गावातील योगिता विकेश धुळसे, मोहाडी गावातील प्रियंका जयंत बसेशंकर, गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनीतील सुषमा पंढरी भंडारी, टाकला येथील दुर्गा विशाल रहांगडाले, रावणवाडी येथील वंदना मोहन सिडाम, उसरला येथील सुकेशिनी धर्मपाल आगरे यांनी प्रशासनाने सकाळी ११ च्या आत चिमुकल्यांचे कलेवर देऊन रुग्णवाहिकेतून रवाना केल्याचे सांगितले. या कुटुंबांनी तत्काळ आपल्या चिमुकल्यांना अखेरचा निरोप दिला. भेटीदरम्यान अनेक मातांनी काही क्षण बोलण्याचेही टाळले. मात्र, त्यांना समजावल्यानंतर मात्र या मातांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. या साऱ्या मातांचा रोष रुग्णालयातील परिचारिका आणि डॉक्टरांवर होता. 

तो बाप ठरला अभागी  
भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात १० नवजात शिशूंचा आगीत होरपळून, गुदमरून दुर्दैवी अंत झाला. या चिमुकल्यांवर अंत्यसंस्कार केल्यानंतरही वंदना मोहन सिडाम नुसतीच रडत होती. रावणवाडी येथील घरी भेट दिल्यानंतर सारा परिवार शोकाकुल होता. कोणीही एकमेकाशीही संवाद साधत नव्हते. मोठी मुलगी ‘रक्षा’ला आणि वडील मोहन सिडाम यांना नुकत्याच जन्माला आलेल्या लेकीचा चेहराही बघता आला नसल्याचे सांगितले. मोहन यांच्याशी मोबाईलवरून संवाद साधल्यानंतर त्यांना हुंदके आवरणे कठीण झाले. रात्री पोहोचलो. अखेरचा निरोप देण्याची संधीही रुग्णालयाने दिली नसल्याचा संताप व्यक्त केला. 
Edited By : Atul Meher

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख