ऊर्जामंत्री नितीन राऊतांचे हाय लिव्हिंग, हाय थिंकिंग... - energy minister nitin raut high living high thinking | Politics Marathi News - Sarkarnama

ऊर्जामंत्री नितीन राऊतांचे हाय लिव्हिंग, हाय थिंकिंग...

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 19 मार्च 2021

डॉक्टरांनी मला प्रवास न करण्याचा सल्ला दिला. त्यावेळी मी व्हीसी द्वारे बैठकांना उपस्थित राहात होतो. पण काही निर्णय असे असतात की जे व्हीसीवर होऊ शकत नाही. म्हणून मग कंपन्यांनी माझ्या येण्याजाण्याची सोय केली.

नागपूर : राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचा बंगला आणि कार्यालयाच्या फोटोंसह भारतीय जनता पक्षाने आपल्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून त्यांच्यावर टिका केली. कोरोना काळात राज्य डबघाईस आले असताना ऊर्जामंत्री बंगल्यावर वारेमाप खर्च करीत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की, हाय लिव्हींग, हाय थिंकिंग... आणि मी बाबासाहेबांचा पाईक आहे. असे असले तरी अवास्तव खर्च करणार नाही, असे उत्तर डॉ. राऊत यांना भाजपच्या ट्विटला दिले आहे. 

ऊर्जामंत्री राऊत म्हणाले, या बंगल्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग पाहात होते. मी मंत्री झालो तेव्हा सव्वा वर्ष भाड्याच्या घरात राहत होतो. अजूनही बंगल्याचे काम अपूर्ण आहे. जुने सोफे इकडून तिकडून आणून टाकले आहेत बस्स. बंगल्याचे काम पूर्ण झाल्यानंतर आपण बोलू शकाल की लॅविष बंगला केला. असे असले तरी मी अवास्तव खर्च करणार नाही. आपण केलेला खर्च योग्य पद्धतीने आहे की नाही, हे पाहत असतो. राज्याचा विरोधी पक्ष म्हणजे केवळ विरोधासाठी विरोध येवढाच आहे. पूर्ण माहिती घेऊन टिका केली पाहिजे. चांगले राहणे आणि चांगले विचार ठेवणे, हे काही वाईट नसते. खर्च विनाकारण झालेला असेल, तरच कुणाला बोलण्याची जागा आहे, अन्यथा नाही. 

आज राज्य सरकारकडे पैशाची चणचण असताना केवळ दीड दिवसाचा कोळसा शिल्लक आहे. सर्व सोंगं घेता येतील, पण पैशांचे सोंग नाही घेता येत. पैशांचं काम पैसाच करतो. कोळसा कंपनी थांबत नाही. आम्हाला १ हजार कोटी रुपये भरायचे आहेत. त्यानंतर कुठे वेकोलि आम्हाला कोळसा देईल. या गोष्टी कुणाला माहिती नसतात आणि त्याचा विचारही केला जात नाही. कॉंग्रेस - राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता असताना १४ हजार कोटी रुपयांची थकबाकी होती. आता ५९ हजार कोटींची थकबाकी आहे. भाजपने कधी वसुली केलीच नाही. शेतकऱ्यांना कमी दराने वीज दिली जाऊ शकते. पण वीज कंपनी खासगी असती तर कमी दराने वीज देणे शक्य होते का? तरीही भाजपला कंपन्यांचं खासगीकरण करायचं असल्याचा टोला डॉ. राऊत यांनी हाणला. 

ॲंजिओप्लास्टी झाल्यानंतर मला ६ सतें लागले. त्यानंतर लॉकडाऊन सुरू झालं. त्या परिस्थितीतही ३ वेळा मी रस्ता मार्गे येण्याचा प्रयत्न केला. पण डॉक्टरांनी मला प्रवास न करण्याचा सल्ला दिला. त्यावेळी मी व्हीसी द्वारे बैठकांना उपस्थित राहात होतो. पण काही निर्णय असे असतात की जे व्हीसीवर होऊ शकत नाही. म्हणून मग कंपन्यांनी माझ्या येण्याजाण्याची सोय केली, असे उत्तर डॉ. राऊत यांनी विरोधकांच्या आरोपावर दिले. शेतकऱ्यांसाठी योजना आणली त्यावेळी ४५ हजार कोटी बाकी होते. १५ हजार कोटी माफ केले आणि ३० हजार कोटी देण्यास सांगितले. शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना वीज देण्यासाठी चांगलं काम होईल, अशी योजना आणली. 

नाना पटोले आमचे प्रांताध्यक्ष, पण...
नाना पटोले आमचे प्रांताध्यक्ष आहेत. ते दिल्लीत होते की नाही, याबाबत मला माहिती नाही. अनुसूचित जातीचा मी राष्ट्रीय अध्यक्ष असल्याने दिल्लीत गेलो होतो. नियमित कामे आणी बैठकांसाठी मला जावेच लागते. पण मंत्रिमंडळात फेरबदल होणार, अशी कुठलीही बाब माझ्यासमोर आली नाही. विरोधकांकडून सतत काही ना काही वावड्या उठविल्या जात आहेत. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट कशी लावता येईल, याच दिशेने भाजपचे राजकारण सुरू आहे. केंद्र सरकार ज्या पद्धतीची वागणूक राज्याला देत आहे, त्यावरून पाणी कुठेतरी मुरत असल्याचे डॉ. राऊत म्हणाले. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख