दत्तात्रय होसबळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नवीन सरकार्यवाह ! - dattatraya hosbale is the news leader of rashtriya swayamsevek sangha | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दत्तात्रय होसबळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नवीन सरकार्यवाह !

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 20 मार्च 2021

दत्तात्रय होसबळे यांनी हस्तलिखित पत्रिकांचे संपादनही केले. सन १९७८ मध्ये नागपूर शहर संपर्कप्रमुख म्हणून विद्यार्थी परिषदेचे पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणूनही त्यांनी काम केले. विद्यार्थी परिषदेमध्ये त्यांनी अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. 

नागपूर : दत्तात्रय होसबळे यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नवीन सरकार्यवाह म्हणून निवड झाली. बेंगळुरूमधील जनसेवा विद्या केंद्रात झालेल्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. ते एच. दत्तात्रय या नावानेच प्रसिद्ध आहे. संघाचे नवीन सरकार्यवाह होसबळेच होतील, अशी चर्चा आधीपासून सुरू होती आणि त्यानुसार आज त्यांची निवड झाली आहे. 

१ डिसेंबर १९५५ ला कर्नाटकमधील शिमोगा जिल्ह्याच्या सोराबा तालुक्यात त्यांचा जन्म झाला. इंग्रजी विषयात त्यांनी स्नातकोत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. सन १९६८ मध्ये १३ वर्षाचे असताना ते संघाचे स्वयंसेवक बनले होते आणि १९७२ मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसोबत जुळले. त्यापुढील १५ वर्ष ते अखिल भारतीय संघटनेमध्ये मंत्री राहिले. १९७५-७७ दरम्यान झालेल्या जेपी आंदोलनात ते सक्रिय होते आणि जवळपास पावणेदोन वर्ष ‘मिसा’ अंतर्गत जेलयात्राही त्यांनी केली आहे. जेलमध्ये त्यांनी हस्तलिखित पत्रिकांचे संपादनही केले. सन १९७८ मध्ये नागपूर शहर संपर्कप्रमुख म्हणून विद्यार्थी परिषदेचे पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणूनही त्यांनी काम केले. विद्यार्थी परिषदेमध्ये त्यांनी अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. 

त्यांचा इथवर प्रवास झाल्यानंतर राष्ट्रीय संघटनेत मंत्री म्हणून त्यांना जबाबदारी देण्यात आली. गुवाहाटीमध्ये युवा विकास केंद्राच्या संचालनात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका निभावली. अंदमान निकोबार द्विपसमूह आणि पूर्वोत्तर भारतामध्ये विद्यार्थी परिषदेच्या कार्याचा विस्तार करण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले. याशिवाय त्यांनी नेपाळ, रूस, इंग्लंड, फ्रान्स आणि अमेरिका या देशांचा दौरा केला आहे. कितीतरी वेळा त्यांनी भारत देशाची प्रदक्षिणा केली आहे. मागच्या काळात नेपाळमध्ये आलेल्या भीषण भूकंपाच्या वेळी आपल्या देशाकडून मदत आणि साहित्य पाठवले गेले. या चमूचे प्रमुख म्हणून ते नेपाळला गेले होते. त्यानंतर सन २००७ पासून ते सह-सरकार्यवाह या पदावर कार्य करत होते.  

मातृभाषा कन्नड आणि इंग्रजी, हिंदी, संस्कृत, तामीळ, मराठी या भाषांवर दत्तात्रेय होसबळे यांचे प्रभुत्व आहे. याशिवाय भारतीय आणि विदेशी भाषांचे विद्वान म्हणून ते प्रख्यात आहेत. लोकप्रिय कन्नड मासिक ‘असीमा’चे ते संस्थापक संपादक आहेत. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख