नागपुरातही दिसला राज्यपाल आणि मविआमधील संघर्ष, मिडियाला मज्जाव...

माध्यमांना प्रवेशबंदी करण्याची विद्यापीठाची इच्छा नव्हती. परंतु, दबावामुळे तसा निर्णय घ्यावा लागला. विद्यापीठाला राज्यपालांच्या कार्यक्रमाचे माध्यमांसाठी ऑनलाइन प्रसारण करणे शक्य होते.
Koshyari - Thackeray
Koshyari - Thackeray

नागपूर : महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्‍यारी Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari आणि महाविकास आघाडी सरकारमधील संघर्ष लपलेला नाही. परंतु त्यांच्यातील नाट्य हे नेहमी मुंबईतच बघायला मिळत होते. पण आता त्याचे पडसाद नागपुरातही बघायला मिळाले. हा सामना आता खालच्या थराला जाऊन पोहोचला आहे. राज्यपालांच्या कार्यक्रमाला प्रसिद्धी मिळू नये, यासाठी बुधवारी नागपूर विद्यापीठात प्रसिद्धी माध्यमांना मज्जाव करण्यात आला. राज्य सरकारच्या दबावात माध्यमांना प्रवेश बंदी केल्याची चर्चा विद्यापीठ वर्तुळात होती. Media was banned. 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथील संरक्षण विषयक अभ्यासक्रम केंद्राचे बुधवारी १५ सप्टेंबर रोजी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रसिद्धी माध्यमांना प्रवेश नाकारण्यात आला होता. कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश नाकारत असल्याचे विद्यापीठातर्फे सांगण्यात आले. परंतु, प्रत्यक्षात राज्य सरकारच्या दबावाखाली विद्यापीठाने राज्यपालांच्या कार्यक्रमात माध्यमांना मज्जाव केल्याची माहिती विद्यापीठातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली. त्यामुळे राज्यपालांच्या विरोधात राज्य सरकार खालच्या थराचे राजकारण करीत असल्याची चर्चा रंगली आहे.

लोकप्रतिनिधींनी फिरवली पाठ 
राज्यात कुठेही राज्यपालांचा दौरा असला की, स्थानिक लोकप्रतिनिधी त्यांच्या स्वागतासाठी जातात अशी परंपरा आहे. परंतु, बुधवारी राज्यपालांचे नागपुरात आगमन झाल्यानंतर पालकमंत्री नितीन राऊत किंवा इतर कुणीही सत्ताधारी आमदार त्यांच्या स्वागतासाठी गेला नाही. केवळ नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी आणि प्रशासनातील इतर अधिकाऱ्यांनी विमानतळावर प्रोटोकॉल म्हणून हजेरी लावली होती.

राज्यपाल कार्यालयाला देखील आश्चर्य
राज्यपालांच्या कार्यक्रमात प्रसिद्धी माध्यमांना प्रवेश का नाही याबाबत विद्यापीठाने सुरुवातीला मौन बाळगले होते. कार्यक्रमात कुणीही माध्यम प्रतिनिधी नसल्याचे पाहून राज्यपाल कार्यालयातील अधिकाऱ्यांनाही आश्चर्य वाटले. यासंदर्भात राज्यपाल कार्यालयाशी संपर्क केला असता आमच्याकडून माध्यमांना मनाई करण्यात आली नव्हती असे राज्यपाल कार्यालयातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

कोरोनामुळे माध्यमांना प्रवेशबंदी
रातुम नागपूर विद्यापीठाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी माध्यमांच्या प्रवेशबंदी संदर्भात सांगितले की, राज्यपालांच्या कार्यक्रमाला केवळ ५० लोकच हजर रहावेत. त्याहून अधिक लोकांना प्रवेश देऊ नयेत अशी पोलिसांची सक्त ताकीद होती. त्यामुळे माध्यमांना राज्यपालांच्या कार्यक्रमात प्रवेश दिला नाही असा खुलासा विद्यापीठातर्फे करण्यात आला.

दबावाचे राजकारण
यासंदर्भात विद्यापीठातील एका वरिष्ठ प्राध्यापकांनी सांगितले की, माध्यमांना प्रवेशबंदी करण्याची विद्यापीठाची इच्छा नव्हती. परंतु, दबावामुळे तसा निर्णय घ्यावा लागला. विद्यापीठाला राज्यपालांच्या कार्यक्रमाचे माध्यमांसाठी ऑनलाइन प्रसारण करणे शक्य होते. परंतु, राजकीय दबाव लक्षात घेता विद्यापीठ दडपणात आले आणि माध्यमांना राज्यपालांच्या कार्यक्रमापासून दूर ठेवले असा धक्कादायक खुलासा त्यांनी केला.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com