चितेगावला मिळाला जेएनयुचा पीएचडीधारक, उच्चविद्याविभूषित ग्रामपंचायत सदस्य - Chitgaon Got jnus phd holdar highly educated grampanchayat member | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांच्यासह सहा जणांवर म्हसवड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे

चितेगावला मिळाला जेएनयुचा पीएचडीधारक, उच्चविद्याविभूषित ग्रामपंचायत सदस्य

संजय तुमराम
सोमवार, 18 जानेवारी 2021

दिल्लीच्या एका नामांकित महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असलेल्या डॉ. कल्याणकुमार यांनी चंद्रपूर मध्ये आल्यानंतर मराठी भाषा अवगत केली. भारतासह जगभरातील इतिहासाचा त्यांचा दांडगा अभ्यास आहे.

चंद्रपूर : उच्चशिक्षित मंडळी राजकारण आणि निवडणूक वगैरे लढवण्याच्या भानगडीत सहसा पडत नाहीत. त्यातल्या त्यात ग्रामपंचायत निवडणूक म्हटली की, नको रे बाबा... अशी त्यांची पहिली प्रतिक्रिया असते. पण एखादा उच्चविद्याविभूषित व्यक्ती जर ग्रामपंचायत निवडणुकीच्या आखाड्यात उतरला, तर समजा की त्याचे ध्येय परिवर्तनाचे आहे, खूप मोठे, वेगळे आहे. असेच एक व्यक्तिमत्त्व जिल्ह्याच्या मूल तालुक्यातील चितेगावला ग्रामपंचायत सदस्य म्हणून मिळाले आहेत, ते म्हणजे डॉ. कल्याण कुमार नयन.

दिल्लीच्या जेएनयूचे विद्यार्थी, विदेशात उच्च शिक्षण, मुंबई उच्च न्यायालयाचे वकील, एल्गार प्रतिष्ठानचे महासचिव डॉक्टर कल्याण कुमार नयन हे चितेगाव ग्रामपंचायतीचे सदस्य बनले आहेत. विशेष म्हणजे ज्येष्ठ समाजसेविका  पारोमिता गोस्वामी यांचे ते पती आहेत. डॉ. कल्याण कुमार यांनी दिल्लीतील आंतरराष्ट्रीय जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून पीएचडी पदवी आणि अमेरिकेतील विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. ते गेल्या काही वर्षांपासून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात वकिली करीत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील ज्येष्ठ समाजसेविका एडवोकेट पारोमिता गोस्वामी यांच्याशी विवाह केल्यानंतर ते चंद्रपूर जिल्ह्यात समाजकार्यात सहभागी झाले होते. 

एल्गार प्रतिष्ठान आणि श्रमिक एल्गारच्या माध्यमातून त्यांनी अनेक आंदोलनात सहभाग घेतला. कामगार आणि आदिवासींवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात याचिकांच्या माध्यमातून न्याय देण्याचे काम करीत असतात. मूल तालुक्यातील चितेगाव येथील ग्रामपंचायतीचे ते मतदार आहेत. गावाचा विकास करण्याच्या दृष्टीने त्यांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केला. अविरोध निवडून देण्यासाठीही प्रयत्न झालेत. मात्र ऐन वेळी राजकीय नेत्यांनी हस्तक्षेप करून निवडणूक लढविण्यासाठी काही विरोधी उमेदवारांना रिंगणात उतरविले आणि शेवटी निवडणूक झालीच. या निवडणुकीत डॉ. कल्याणकुमार वार्ड क्रमांक १ मधून निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले आणि विजयी झाले. 

दिल्लीच्या एका नामांकित महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असलेल्या डॉ. कल्याणकुमार यांनी चंद्रपूर मध्ये आल्यानंतर मराठी भाषा अवगत केली. भारतासह जगभरातील इतिहासाचा त्यांचा दांडगा अभ्यास आहे. उच्च विद्याविभूषित ग्रामपंचायत सदस्य झालेले हे चंद्रपूर जिल्ह्यातील बहुधा पहिलेच उमेदवार असण्याची शक्यता आहे. ते आता चितेगावचे कारभारी असतील. चितेगाव येथे 7 सदस्यीय ग्रामपंचायतीत डॉ. कल्याणकुमार यांच्या पॅनलचे 5 सदस्य निवडून आले आहेत. गावाच्या भल्यासाठी उत्तम कार्य करण्याचे उद्दिष्ट डोळ्यापुढे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. मूल तालुक्यातील चितेगावला राज्यातील अग्रणी गाव करण्याचा त्यांचा मानस आहे. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख