फडणविसांच्या बालेकिल्ल्यातच भाजपला धक्का : माजी आमदार 'हात' पकडण्याच्या तयारीत...

एखाद्या बड्या नेत्याला पक्षात घेताना त्याच्या खास समर्थकांनाही सामावून घ्यावे लागते. प्रत्येकाचे समाधान कसे करायचे, हा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे स्थानिक पदाधिकारी व नेत्यांमध्येही रोष निर्माण होतो. पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीत दावेदार वाढतात. असा सर्व पेच आहे.
फडणविसांच्या बालेकिल्ल्यातच भाजपला धक्का : माजी आमदार 'हात' पकडण्याच्या तयारीत...
Devendra Fadanvis

नागपूर : यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी येथील भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार राजू तोडसाम Former MLA Raju Todsam यांची भाजप सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. त्यानंतर नागपुरातील भाजपच्या एका माजी आमदाराने कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याची तयारी चालवल्याची माहिती आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले State President of congress Nana Patole यांच्याशी त्यांची याबाबत चर्चासुद्धा झाल्याचे सूत्र सांगतात. नाना पटोले यांच्या जवळचा भंडाऱ्यातील माणूस सूर्यकांत इलमे भाजपने घेतला होता. त्याची परतफेड करण्याची संधी या निमित्ताने पटोले यांना मिळणार आहे.

आमदार म्हणून चांगली कामगिरी केली असतानाही पक्षाने २०१९ मध्ये ऐन वेळेवर चाट दिली. तेव्हापासून हे आमदार पक्षावर चांगलेच नाराज आहेत. सोशल मिडियावर त्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्तही केली होती. त्यांचा रोख तत्कालीन मुख्यमंत्र्‍यांकडे होता. त्यानंतर पक्ष कोणतीतरी जबाबदारी देईल, याची वाटही या माजी आमदारांनी बघितली. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. पक्षात राहून सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, अशी त्यांची अवस्था झाली आहे. पक्षाच्या कार्यक्रमांना, बैठकांना बोलावणेही बंद झाले आहे. त्यामुळेच त्यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येते.  

ठरल्याप्रमाणे सर्व काही झाल्यास महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये मोठा धमाका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या संबंधित आमदार या विषयावर बोलायला काहीही तयार नाहीत. राजकारणात अशा अफवा पसरविल्या जातच असतात, असे त्यांचे म्हणणे आहे. राज्यातील पाच वर्षांच्या सत्तेनंतर भाजपने विधानसभेची उमेदवारी वाटप करताना अनेकांना धक्के दिले होते. माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे, विनोद तावडे, नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे तिकीट कापले होते. बड्या नेत्यांची नावे असल्याने भाजपच्या या आमदारांची तेव्हा फारशी चर्चा राजकीय वर्तुळात झाली नव्हती. 

त्यांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करून नाराजी व्यक्त केली होती. जुन्या मित्राला गिफ्ट देण्यासाठी आपला बळी दिल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यांचा रोख तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होता. भाजपमध्ये राहून पुनर्वसन होण्याची कुठलीही शक्यता नाही. कोणी दखलही घेत नाही आणि बैठकांनासुद्धा बोलवत नसल्याने ते सध्या प्रचंड अस्वस्थ आहेत. असेच सुरू राहिल्यास राजकीय अस्तित्वच संपण्याची शक्यता असल्याने त्यांनी पक्षातून बाहेर पडण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला आपली ताकद दाखवून देण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे समजते. महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने विस्तारासाठी इनकमिंग फ्री केले आहे. त्यामुळे काँग्रेसही काही मोठ्या नेत्यांच्या शोधातच आहे. त्यात माजी आमदाराच येत असले काँग्रेसलाही ते हवेच आहे. 

‘वेट अँड वॉच' 
एखाद्या बड्या नेत्याला पक्षात घेताना त्याच्या खास समर्थकांनाही सामावून घ्यावे लागते. प्रत्येकाचे समाधान कसे करायचे, हा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे स्थानिक पदाधिकारी व नेत्यांमध्येही रोष निर्माण होतो. पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीत दावेदार वाढतात. असा सर्व पेच आहे. त्यामुळे ‘वेट अँड वॉच'च्या भूमिकेत सध्या संबंधित आमदार असल्याचे कळते.
Edited By : Atul Mehere

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in