कायद्याच्या कचाट्यात सापडलेले अनिल देशमुख हे नागपुरातील तिसरे नेते !

‘सच परेशान हो सकता है, लेकिन पराजित नही’, असे वक्तव्य त्यांनी कालच केले. त्यामुळे कायद्याच्या कचाट्यातून सहीसलामत सुटून पुन्हा आपली कारकीर्द पूर्वपदावर आणतील का ?
Anil Deshmukh
Anil Deshmukh

नागपूर : राज्याचे माजी पोलिस महासंचालक परमबिर सिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर राज्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले. कायद्याच्या कचाट्यात सापडलेले देशमुख नागपूर शहरातील तिसरे नेते आहेत. यापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार हेसुद्धा भ्रष्टाचाराच्या आरोपांत अडकले होते. 

नितीन गडकरी यांच्यावर तेव्हा केल्या गेलेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नव्हते, असे कालांतराने लक्षात आले. पण तरीसुद्धा गडकरी आज केंद्रीय मंत्री आहेत. पण सुनील केदार यांचा जिल्हा बॅंक घोटाळा चांगलाच गाजला होता आणि अजूनही हे प्रकरण पूर्णपणे निकाली निघालेले नाही. न्यायालयात तारखा सुरूच आहेत. तरीही केदार राज्यात कॅबिनेट मंत्री आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप झाले. सीबीआयने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आणि ईडीमार्फतही त्यांची चौकशी सुरू आहे. आता देशमुख यातून मार्ग काढतील का आणि कशाप्रकारे यावर आता राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू आहेत. 

नितीन गडकरी हे रोखठोक नेते आहेत आणि बोलताना ते कुणाचीही फिकीर करत नाहीत. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी जेव्हा ही कारवाई सुरू केली होती. तेव्हा गडकरी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. ‘असे खोटेनाटे कामं कराल, तर लक्षात ठेवा. उद्या मी सत्तेत आल्यावर तुम्हाला निश्‍चितपणे पाहून घेईन’, असे खडे बोल सुनावले असल्याचे जुनेजाणते सांगतात. मग झालेही तसेच. चौकशीमध्ये काहीही आढळले नाही. पण त्यानंतर मात्र गडकरी पुन्हा दुसऱ्यांदा पक्षाचे राष्‍ट्रीय अध्यक्ष होऊ शकले नाही. मात्र त्यांच्या कारकिर्दीचा आलेख सतत चढताच राहिला आहे. 

यापूर्वी ते पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि नागपूर पदवीधर मतदारसंघातील विधानपरिषद सदस्य राहिले आहेत. महाराष्ट्रात सन १९९५-१९९९ या काळात भाजप-शिवसेना युतीचे सरकार सत्तेत असताना ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. त्यांच्या मंत्रिपदाच्या काळात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गासह अनेक नवीन रस्ते व किमान ५५ उड्डाणपूल बांधले गेले. इ.स. २००९ साली त्यांची भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाल्यावर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडले गेलेले ते दुसरे मराठी नेते ठरले. आजही केंद्रीय मंत्रिमंडळातील एक वजनदार नेते म्हणून त्यांची ओळख सर्वदूर आहे. 

विद्यमान पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार हेसुद्धा नागपूर जिल्हा बॅंक घोटाळ्यात अडकले होते. १९९५ मध्ये पहिल्यांदा सावनेर विधानसभा मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आल्यावर ६ अपक्ष आमदारांना सोबत घेऊन त्यांनी भाजप-शिवसेनेच्या युती सरकारला पाठिंबा दिला होता आणि सरकारमध्ये ते ऊर्जा व परिवहन राज्यमंत्री होते. त्यानंतर १९९९ च्या निवडणुकीत देवराव आसोले यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर नागपूर जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष असताना २००० ते २००१ मध्ये १५२ कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला होता. त्या परिस्थितीशीही दोन हात करत २००४ मध्ये ते पुन्हा आमदार म्हणून निवडून आले. ते आजतागायत सतत आमदार म्हणून निवडून येत आहेत. सध्या ते राज्य सरकारमध्ये पशुसंवर्धन मंत्री आहेत. केवळ बॅंक घोटाळ्यामुळे ते १९९९ नंतर मंत्री होऊ शकले नाही, असे सांगितले जाते. १९९९ चा अपवाद वगळता आमदारकीची ही त्यांची पाचवी टर्म आहे. 

सद्यःस्थितीत काटोलचे आमदार आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याभोवती सीबीआय आणि ईडीतर्फे कारवाईचा पाश आवळला जात आहे. १९९५ पासून केवळ एक वेळ त्यांना काटोलमध्ये पराभव पत्करावा लागला. त्यांचे पुतणे डॉ. आशीष देशमुख हे २०१४ मध्ये काटोलचे आमदार झाले. २०१४ चा अपवाद वगळता केदार याच्याप्रमाणेच ते ५ वेळा आमदार म्हणून निवडून आले आणि प्रत्येक वेळी मंत्रीही झाले. सर्वाधिक काळ मंत्री राहणारे जिल्ह्यातील एकमेव नेते म्हणून त्यांनी विक्रम केला आहे. मंत्री म्हणून देशमुखांची पाचवी टर्म होती. पण यावेळी त्यांच्याच विभागातील अधिकाऱ्यांनी गंभीर आरोप केले. सीबीआयने त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. ईडीतर्फे त्यांची चौकशीही सुरू आहे. पण आतापर्यंतच्या चौकशीमध्ये कोणतेही ठोस पुरावे  
सापडले नसल्याची माहिती आहे. ‘सच परेशान हो सकता है, लेकिन पराजित नही’, असे वक्तव्य त्यांनी कालच केले. त्यामुळे कायद्याच्या कचाट्यातून सहीसलामत सुटून पुन्हा आपली कारकीर्द पूर्वपदावर आणतील का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com