वाद थांबेना : IAS तुकाराम मुंढे यांच्याविरोधात फसवणुकीची महापौरांची पोलिसांत तक्रार - nagpur mayor files complaint against tukaram mundhe In smart city case | Politics Marathi News - Sarkarnama

वाद थांबेना : IAS तुकाराम मुंढे यांच्याविरोधात फसवणुकीची महापौरांची पोलिसांत तक्रार

अतुल मेहेरे
सोमवार, 22 जून 2020

तुकाराम मुंढे यांच्याविरोधात भाजपने आता सर्व पातळ्यांवर तक्रारी करण्यास सुरवात केली आहे. 

नागपूर : नागपूर महापालिकेत महापौर संदीप जोशी आणि आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यातील वाद आता विकोपाला गेला असून त्यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी जोशी यांनी सदर पोलिस ठाणे गाठले आणि त्यांच्याविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. स्मार्ट आयुक्तांचा स्मार्ट घोटाळा म्हणून जोशी यांनी आरोप केला आहे. याबाबत पोलिस हे आर्थिक गुन्हे शाखेमार्फत तपास करणार असल्याचे जोशी यांनी सांगितले. यावर अद्याप मुंढे यांनी खुलासा केेलेला नाही. 

ही तक्रार नागपूर महापालिकेच्या कारभारावरून झालेली नसून नागपूर स्मार्ट सिटिच्या कारणावरून झालेली आहे. नागपूर स्मार्ट सिटी या कंपनीच्या संचालकपदावरून हा वाद निर्माण झाला आहे. मुंढे हे सध्या स्मार्ट सिटीचे सीईओ आहेत. त्यांना संचालकपदी घेण्यासाठीची बैठक झालेली नसतानाही ते संचालक झाले आणि सीईओदेखील झाले, असा आक्षेप जोशी यांनी घेतला आहे. या कंपनीची शेवटची बैठक ही डिसेंबरमध्ये झाली. मुंढे हे जानेवारीमध्ये नागपूरात रुजू झाले.

त्यामुळे कंपनीत त्यांची संचालक म्हणून नियुक्ती झालेली नसतानाही ते सीईओ झाले. त्यांनी कंपनीच्या बॅंकखात्याचे अधिकार आपल्याकडे घेतले. ते अधिकार आल्यानंतर त्यांनी वीस कोटी रुपयांची बिले ठेकेदाराला दिली. कंपनीच्या धनादेशावर सह्या केल्या, असा आरोप जोशी यांनी केला आहे. महापालिकेतील वादाचा आणि या तक्रारीचा संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुंढे यांच्या म्हणण्यानुसार कंपनीच्या चेअरमनने मला मौखिक सूचना देण्यात आली होती म्हणून मी  स्मार्ट सिटीत रुजू झालो असल्याचा दावाही त्यांनी खोडून काढला. कंपनी कायद्यानुसार कोणाच्या मौखिक सांगण्यावरून संचालक म्हणून येता येत नाही. याबाबत पोलिसांना मी माझ्याजवळील सर्व कागदपत्रे दिली आहेत. तसेच पंतप्रधान कार्यालय, मुख्यमंत्री कार्यालय, नगरविकास विभाग, आयएएस अधिकाऱ्यांची संघटना या सर्व ठिकाणी या तक्रारी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख