आजचा वाढदिवस : नितीन गडकरी - todays birthday nitin gadkari | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

आजचा वाढदिवस : नितीन गडकरी

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 27 मे 2021

पर्यटनस्थळांना महामार्गांनी जोडण्यात येत आहे. त्यासाठी कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. धार्मिक, दीपगृह, निसर्ग पर्यटन, रो-रो सेवा, मुंबई-गोवा क्रूझ बोट सेवा, व्याघ्र पर्यटनासह इतर पर्यटनाच्या भन्नाट कल्पना केंद्रीय महामार्ग वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या आहेत. 

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन जयराम गडकरी यांना कोणत्याच परिचयाची गरज नाही. त्यांचा जन्म २७ मे १९५७ रोजी झाला. ते भारतीय जनता पक्षाचे नेते आणि उद्योजक आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. भारताच्या १६व्या लोकसभेमध्ये नागपूर लोकसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. ते भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. २६ मे २०१४ ला मंत्रिपदाची शपथ घेतली. भूपृष्ठ वाहतूक व जहाज या मंत्रालयाचा कार्यभार त्यांनी २९ मे २०१४ रोजी स्वीकारला.

यापूर्वी ते पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि नागपूर पदवीधर मतदारसंघातील विधानपरिषद सदस्य राहिले आहेत. महाराष्ट्रात सन १९९५-१९९९ या काळात भाजप-शिवसेना युतीचे सरकार सत्तेत असताना ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. त्यांच्या मंत्रिपदाच्या काळात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गासह अनेक नवीन रस्ते व किमान ५५ उड्डाणपूल बांधले गेले. २००९ साली त्यांची भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाल्यावर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडले गेलेले ते दुसरे मराठी नेते ठरले. कुशाभाऊ ठाकरे हे पक्षाचे पहिले मराठी राष्ट्रीय अध्यक्ष होते.

पर्यटन क्षेत्राचे मेरुमणी :
पर्यटन क्षेत्र हे सध्या सर्वाधिक रोजगार निर्मिती करणारे क्षेत्र आहे. पर्यटन क्षेत्राचा अधिक विकास आणि या क्षेत्राला चालना देण्यामुळे अर्थव्यवस्थाही मजबूत होईल. ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेत पर्यटन क्षेत्र हे अत्यंत महत्त्वाचे क्षेत्र आहे. याअंतर्गत देशातील विविध भागातील पर्यटनस्थळांना महामार्गांनी जोडण्यात येत आहे. त्यासाठी कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. धार्मिक, दीपगृह, निसर्ग पर्यटन, रो-रो सेवा, मुंबई-गोवा क्रूझ बोट सेवा, व्याघ्र पर्यटनासह इतर पर्यटनाच्या भन्नाट कल्पना केंद्रीय महामार्ग वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या आहेत. 

बुद्ध सर्किट :
पर्यटन हे धार्मिक, सांस्कृतिक, कोणत्याही क्षेत्रातील असो ते रोजगार निर्मिती करणारे क्षेत्र आहे. पर्यटन क्षेत्राचा विकासात रस्त्यांची आवश्यकता प्राधान्याने असते. धार्मिक स्थळांना जोडणारे अनेक महामार्ग आहेत. मात्र, त्याबद्दल माहिती नसल्याने रस्ते महामार्ग प्राधिकरणामार्फत याचा अभ्यास करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. सध्या १० हजार कोटी खर्च करून बुद्ध सर्किट तयार केले जात आहे. ९४५ किलोमीटरचे ४ ते ६ पदरी महामार्ग या अंतर्गत बांधण्यात येत आहेत. यात लुंबिनी, बोधगया, सारनाथ आणि कुशीनगर मार्गाचा विकास होणार आहे. विस्तारित धर्मयात्रा सर्किट- बोधगया, विक्रमशीला, सारनाथ, कुशीनगर, कपिलवस्तू, संकिसा आणि पिपरहवा या क्षेत्रापर्यंत रस्ते विकास करण्याचा संकल्प नितीन गडकरी यांनी केला असून त्यादृष्टीने युद्धपातळीवर कामही सुरू झालेले आहे. 

दीपगृह पर्यटन :
देशातील दीपगृहांचा विकास करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सरकारने हाती घेतला असून ही दीपगृह पर्यटन क्षेत्राचे मेरुमणी ठरणार आहे. दीपगृहांच्या सभोवतालचे सौंदर्य तसेच समृद्ध सागरी वारसा यामुळे संपूर्ण जगभरात दीपगृहांकडे पर्यटकांचा ओढा वाढला आहे. भारतात, पर्यटनाच्या अमाप क्षमता आहेत, ज्यांचा पुरेपूर वापर अद्याप न झाल्याने त्याकडे नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून याचा विकास केला जात आहे. 

कल्पकतेला प्रोत्साहन देण्यासाठी ‘स्वीस चॅलेंज’ पद्धतीचा वापर करण्याचा जहाज बांधणी मंत्रालयाचा मानस आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी दीपगृहांच्या परिसरात हॉटेल, सागरी जीवनाशी निगडीत गोष्टींचे वस्तू संग्रहालय, धाडसी क्रीडा प्रकार, लेझर शो यासह इतर सुविधांचा या विकास कामात समावेश राहणार आहे. दक्षिण कोरिया, स्कॉटलंड आणि दक्षिण आफ्रिका या देशांनी दीपगृह पर्यटनाचा पाया घातला. भारताने जरी या क्षेत्रात उशिराने पाऊल टाकले असले तरी भविष्यात लवकरच यामध्ये विकास साधला जाणार आहे असा मानसही गडकरी यांचा आहे. 

क्रुझ पर्यटन :
देशात आंतरराष्ट्रीय क्रुझमधून येत्या पाच वर्षात सुमारे ४० लाख परदेशी पर्यटक येणार आहेत. त्यांपैकी ३१ लाख पर्यटक हे मुंबईत  
येतील. यातून ३० हजार कोटींचे परकीय चलन देशाला मिळणार आहे. यातून अडीच लाख नव्या रोजगारांची निर्मिती होणार आहे. जगात क्रुझ पर्यटनाला मोठे महत्त्व आहे. मुंबई त्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. केंद्र क्रुझ पर्यटनाला मोठ्या प्रोत्साहन देण्यावर गडकरी यांच्या नेतृत्वात सुरुवात करण्यात आलेली आहे. यातून रोजगार व पर्यटनासाठी नवीन पर्व सुरू होणार आहे. २०१७-१८ या वर्षात १.६ लाखाहून अधिक क्रुझ पर्यटकांनी भेट दिली. २०२८ पर्यंत पर्यटन आणि प्रवास क्षेत्रात १ कोटी नोकऱ्यांची भर पडणार आहे. यातून स्थानिक व प्रादेशिक संस्कृती अधिक लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. 

राज्यातील धार्मिक विकास :
धार्मिक पर्यटनस्थळे जोडणे. बुटीबोरी तुळजापूर आठ हजार कोटींचा ५३२ किमी रस्ता, संत तुकाराम महाराज पालखी मार्ग ३३५५ कोटींचा १४६ किमी, संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग ५६३३३ कोटींचा २७० किमीचा रस्ता, साईबाबा पालखी मार्ग १०७१ कोटींचा ५१ किमीचा मार्ग, नांदेड- देगलूर- बिदर ३७० कोटी खर्चून १४० किमीचा रस्ता, सरलगाव-भीमाशंकर ३५० कोटींचा ५० किमीचा मार्ग, महाबळेश्वर-पाचगणी ४६२ कोटींचा ६६ किमीचा मार्ग, जिंतूर औंढा नागनाथ ४७० कोटींचा ७२ किमी मार्ग, परळी वैजनाथ- अंबाजोगाई ५२० कोटींचा ६५ किमीचा मार्ग तयार करण्यात येत आहे. हे सर्व नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारले आहेत. 

हेही वाचा : लूट करणाऱ्यांना मोकळीक, दाद मागणाऱ्यांवर गुन्हे

व्याघ्र पर्यटन :
विदर्भ वन पर्यटनाची पंढरी आहे. महाराष्ट्रात एकूण सहा व्याघ्र प्रकल्प आहेत. त्यातील ताडोबा- अंधारी, मेळघाट, पेंच, नवेगावबांध- नागझीरा, बोरसह पाच विदर्भात आहेत. हे पाच आणि इतर राज्यांतील आठ व्याघ्र प्रकल्प मिळून एकूण १३ व्याघ्र प्रकल्प विदर्भाच्या ३०० चौरस किलोमीटरच्या परिक्षेत्रात आहेत. त्यामुळेच विदर्भाला देशाची व्याघ्र राजधानी म्हटले जाते. सहा व्याघ्र प्रकल्पांबरोबरच अनेक राष्ट्रीय उद्याने आणि राखीव वनक्षेत्रांचाही विदर्भात समावेश होतो. या व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन वाढविण्यासाठी नितीन गडकरी यांनी यांना राष्ट्रीय महामार्गाने जोडले असून रस्ते गुळगुळीत केले आहे. थोड्या कामातून निवांतपणा मिळविण्यासाठी सर्वसामान्यांपासून ते श्रीमंतांचा कल पर्यटनाकडे वाढतो आहे. त्यामुळे हे क्षेत्र नक्कीच लवकर भरारी घेईल, असा विश्वासही गडकरी यांना आहे. 

भूषविलेली पदे :
माजी मंत्री, सार्वजनिक बांधकाम विभाग, व पालकमंत्री, नागपूर, महाराष्ट्र शासन.
चेअरमन, पूर्ती ग्रुप
अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र राज्य
माजी विरोधी पक्ष नेता, महाराष्ट्र विधान परिषद
माजी-सदस्य (आमदार),महाराष्ट्र विधान परिषद, (पदवीधर मतदार संघ) महाराष्ट्र. 
माजी सदस्य, हाय पॉवर कमेटी फॉर प्रायव्हटायझेशन, महाराष्ट्र शासन.
माजी-अध्यक्ष, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ.
अध्यक्ष, प्रधानमंत्री, ग्राम सडक योजना.
राज्य अध्यक्ष, भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र.
राष्ट्रीय अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी. 
Edited By : Atul Meher

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख