nagpur-shivsena-ayodhya-yatra-yogi-adityanath | Sarkarnama

शिवसेनेच्या अयोध्या संवाद यात्रेवर योगी आदित्यनाथांचे मौन 

सुरेश भुसारी
शुक्रवार, 23 नोव्हेंबर 2018

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात अयोध्येत होणाऱ्या संवाद रॅलीवर काहीही बोलण्यास उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नकार दिला.

नागपूर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात अयोध्येत होणाऱ्या संवाद रॅलीवर काहीही बोलण्यास उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नकार दिला.
 
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने नागपुरात आयोजित "ऍग्रोव्हिजन' प्रदर्शनाच्या उद्‌घाटन कार्यक्रमासाठी योगी आदित्यनाथ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. रेशिमबाग मैदानावर झालेल्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, राज्याचे कृषी मंत्री चंद्रकांतदादा पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. 

या कार्यक्रमानंतर पत्रकारांनी योगी आदित्यनाथ यांना सेनेच्या संवाद रॅलीवर बोलते करण्याचा प्रयत्न केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात अयोध्या येथे 24 व 25 नोव्हेंबरला संवाद रॅली होणार आहे. यावरून सध्या वाद निर्माण झाला आहे. या रॅलीत अयोध्यातील आखाडा प्रमुखांनी सहभागी होण्यास आधीच नकार दिला आहे. अयोध्येत होणारी उद्धव ठाकरे यांची सभा रद्द झाली असून आता केवळ संवाद रॅली होणार आहेत.
 
यासंदर्भात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्रकारांनी विचारणा केल्यानंतर त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. पत्रकारांनी प्रश्‍न विचारल्यानंतर "मी यावर काहीही बोलणार नाही' असे म्हणत वाहनात बसून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ विमानतळाकडे रवाना झाले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख