nagpur-rajyasabha-deputy-chairmanship-marathi-politician | Sarkarnama

राज्यसभेच्या उपसभापतीच्या पहिल्या निवडणुकीत मराठी माणसाने रोवला होता झेंडा

केवल जीवनतारे
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

राज्यसभेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीवरून सध्या राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. राज्यसभेच्या उपसभापतीपदाची पहिली निवडणूक जिंकण्याचा मान मात्र एका मराठी नेत्याला मिळाला आहे. रिपब्लिकन पक्षाचे नेते राजाभाऊ खोब्रागडे यांनी उपसभापतीपदासाठी झालेली पहिली निवडणूक जिंकली होती.

नागपूर : राज्यसभेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीवरून सध्या राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. राज्यसभेच्या उपसभापतीपदाची पहिली निवडणूक जिंकण्याचा मान मात्र एका मराठी नेत्याला मिळाला आहे. रिपब्लिकन पक्षाचे नेते राजाभाऊ खोब्रागडे यांनी उपसभापतीपदासाठी झालेली पहिली निवडणूक जिंकली होती.

राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी 9 ऑगस्टला निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत भाजपची सरशी होईल की, विरोधी पक्ष बाजी मारेल, हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे. विरोधकांतर्फे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या वंदना चव्हाण यांचेही नाव या पदाच्या निवडणुकीसाठी समोर आले होते. राजकीय जुळवाजुळव होत नसल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसने हा दावा सोडल्याचे बोलले जात आहे. राजकीय समीकरणामुळे मराठी व्यक्तीला या पदापासून राहावे लागणार असले तरी या पदासाठी झालेल्या पहिल्या निवडणुकीत मात्र एका मराठी माणसाने बाजी मारली होती. 

राज्यसभा स्थापन झालेल्यापासून 1969 पर्यंत उपसभापतीपदाची निवडणूक अविरोध झाली होती. त्यामुळे या पदासाठी निवडणूक झालीच नव्हती. कॉंग्रेसच्या नेत्या असलेल्या व्हायोलेट अल्वा यांनी राज्यसभेच्या उपसभापतीपदाचा 1969 मध्ये राजीनामा दिला. यामुळे पहिल्यांदाच निवडणूक घ्यावी लागली. या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे नेते व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निष्ठावंत कार्यकर्ते राजाभाऊ खोब्रागडे यांनी निवडणूक लढविली. यात खोब्रागडे 128 मते घेऊन विजयी झाले होते. पहिले गैरकॉंग्रेसी उपसभापती म्हणून राजाभाऊ खोब्रागडे यांची नोंद झाली आहे. 

राजाभाऊ खोब्रागडे मूळचे चंद्रपूर जिल्ह्यातील होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अत्यंत विश्‍वासातील नेते म्हणून ते ओळखले जात होते. पहिले मराठी व्यक्ती म्हणून त्यांची उपसभापतीपदावर झालेली निवड विशेष आहे. ते 1972 पर्यंत उपसभापतीपदावर होते. यानंतरही ते 1984 पर्यंत राज्यसभेवर सदस्य म्हणून होते.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख