nagpur-rahul-gandhi-narendra-modi | Sarkarnama

`नरेंद्र मोदींच्या अजेंड्यावर शेतकरी नाही' 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 13 जून 2018

पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठ्या उद्योजकांच्या मदतीसाठी धावून जातात. परंतु शेतकऱ्यांच्या हलाखीची स्थितीवर त्यांना बोलायला वेळ नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अजेंड्यावर शेतकरी नाही. ते मोठ्या उद्योजकांचे पाठीराखे आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदी आपल्यासाठी काही करतील, ही आशा आता शेतकऱ्यांनी सोडून द्यावी, अशा शब्दात कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारचा समाचार घेतला. 

नांदेड (जि. चंद्रपूर) : पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठ्या उद्योजकांच्या मदतीसाठी धावून जातात. परंतु शेतकऱ्यांच्या हलाखीची स्थितीवर त्यांना बोलायला वेळ नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अजेंड्यावर शेतकरी नाही. ते मोठ्या उद्योजकांचे पाठीराखे आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदी आपल्यासाठी काही करतील, ही आशा आता शेतकऱ्यांनी सोडून द्यावी, अशा शब्दात कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारचा समाचार घेतला. 

चंद्रपूर जिल्ह्यातील नांदेड येथे "किसान चौपाल'मध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांना उत्तर देताना त्यांनी नरेंद्र मोदींना लक्ष्य केले. एचएमटी तांदळाचे जनक व प्रसिद्ध धान संशोधक दादाजी खोब्रागडे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी राहुल गांधी आज आले होते. त्यांनी कुटुंबियाला अडीच लाख रुपयांचा धनादेश दिला तसेच एकूण आडेआठ लाख रुपयांची मदत केली जाणार आहे. यानंतर त्यांनी किसान चौपालमध्ये शेतकऱ्यांच्या विविध प्रश्‍नांना उत्तरे दिली. नागपूरपासून जवळपास 120 किलोमीटर अंतरावर असलेल्या या छोट्या गावात जवळपास 3 हजारावर शेतकरी जमा झाले होते. 

यावेळी युवा शेतकरी सागर खोब्रागडे, शेतकरी रामकृष्ण देशमुख व महिला शेतकरी अविशा रोकडे यांनी राहुल गांधींना प्रश्‍न विचारले. वाढती बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या व कर्जमुक्ती या विषयांभोवती या शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांचा रोख होता. या प्रश्‍नांना उत्तरे देताना राहुल गांधींनी शेतकऱ्यांचे प्रश्‍न केवळ कर्जमुक्तीने सुटणार नाही, याची कबुली दिली. 

शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी आता नव्या हरीत क्रांतीची गरज असल्याचे प्रतिपादन करून ते म्हणाले, इंदिरा गांधींनी हरीत क्रांती केल्याने शेतकऱ्यांची उत्पादन क्षमता वाढली व देश कृषी क्षेत्रात स्वावलंबी झाला. या प्रकारच्या हरीत क्रांतीची आता गरज आहे. मी येथे खोटे आश्‍वासन देण्यासाठी आलो नाही. मी तुम्हाला 15 लाख देईन, असे आश्‍वासन देणार नाही. खोट्या आश्‍वासनाने देशाचे प्रश्‍न सुटत तर नाही मात्र मतदारांची फसवणूक होते, हे आपल्याला गेल्या चार वर्षात दिसून आले, याची आठवण राहुल गांधींनी लोकांना करून दिली. यावर लोकांनी टाळ्या वाजवून राहुल गांधींच्या वक्तव्याला प्रतिसाद दिला. 

किसान चौपालपूर्वी राहुल गांधी यांनी दादाजी खोब्रागडे यांच्या घरी जाऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी कुटुंबियांचे म्हणणे ऐकून घेतले. प्रदेश कॉंग्रेस पक्षातर्फे खोब्रागडे कुटुंबियांना अडीच लाख रुपयांचा धनादेश राहुल गांधी यांच्या हस्ते दिला. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाराष्ट्रातील कॉंग्रेस आमदारांतर्फे 5 लाख रुपये, माजी खासदार नरेश पुगलिया यांनी 1 लाख रुपये व एका सदस्याला नोकरी देण्याचे आश्‍वासन दिले. यावेळी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, कॉंग्रेसचे सरचिटणीस अशोक गहलोत, राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश, आमदार विजय वडेट्टीवार, माजी खासदार नाना पटोले, आमदार यशोमती ठाकूर आदी उपस्थित होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख