nagpur-radhakrishna-vikhe-patil-sunil-kedar | Sarkarnama

`मुळा-प्रवराचे 1000 कोटी कसे माफ केले?'; कॉंग्रेसचे आमदार सुनील केदार यांचा राधाकृष्ण विखे पाटलांवर हल्लाबोल

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील संचालक असलेल्या मुळा-प्रवरा सहकारी सोसायटीचे 1000 कोटी रुपयांचे वीज बिल कसे माफ केले? असा सवाल कॉंग्रेसचे आमदार सुनील केदार यांनी केला आहे. कॉंग्रेस आमदारानेच राधाकृष्ण विखे पाटलांवर हल्लाबोल केल्याने राजकीय तर्कवितर्क लावले जात आहे. 

नागपूर : विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील संचालक असलेल्या मुळा-प्रवरा सहकारी सोसायटीचे 1000 कोटी रुपयांचे वीज बिल कसे माफ केले? असा सवाल कॉंग्रेसचे आमदार सुनील केदार यांनी केला आहे. कॉंग्रेस आमदारानेच राधाकृष्ण विखे पाटलांवर हल्लाबोल केल्याने राजकीय तर्कवितर्क लावले जात आहे. 

नागपुरात विद्युत नियामक आयोगाच्या जनसुनावणीला आमदार सुनील केदार उपस्थित होते. यावेळी त्यांनी मोठ्या थकबाकीदारांची यादी वाचून दाखविली. यात रिलायन्स, एल अँड टी या कंपन्यांचा उल्लेख केला. यावेळी त्यांनी विखे पाटलांच्या मुळा-प्रवरा या संस्थेकडे असलेली 1000 कोटींची थकबाकी कशी माफ केली? असा सवाल आमदार केदार यांनी केला. 

आमदार केदार यांच्या या वक्तव्याला राजकीय रंग दिला जात आहे. आमदार केदार यांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी सख्य आहे. आमदार केदार यांच्या सावनेर या मतदारसंघात भाजपतर्फे नेहमीच कमजोर उमेदवार दिला जातो. 

गेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार केदार यांच्या विरोधात भाजपचा उमेदवारच नव्हता. भाजपच्या उमेदवाराचा अर्ज ऐनवेळी रद्द झाला होता. अखेर भाजपने एका अपक्ष उमेदवाराला पाठिंबा जाहीर केल्याने केदार यांना विजय संपादन करता आला, असेही बोलले जात आहे. आमदार केदार यांचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी "गट्टी' आहे.
 
अचानकपणे आमदार केदार यांनी टाकलेला हा "बाऊंसर' विखे पाटलांवर होता की भाजपमधील "एंट्री' निश्‍चित करण्यासाठी होती, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेत्यावरच हल्लाबोल करून आमदार केदार यांनी वेगळे राजकीय संकेत दिल्याचे बोलले जात आहे. आमदार केदार यांचे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रावरही प्रभाव आहे. केदारांच्या भाजप प्रवेशाने सहकार क्षेत्रावर वरचष्मा राहू शकतो.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख