विधानसभेचे तिकिट कापल्याची आठवण नानांनी करून देताच बावनकुळेही भावूक - Chandrashekhar Bawankule gets emotional in Nana Patole speech | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

विधानसभेचे तिकिट कापल्याची आठवण नानांनी करून देताच बावनकुळेही भावूक

अतुल मेहेरे
सोमवार, 28 जून 2021

ओबीसी आरक्षण बचाव परिषदेत राजकीय कोपरखळ्या... 

लोणावळा (जि. पुणे) : ओबीसी चिंतन शिबिराच्या विचारपीठावरून कुणीही राजकिय भाष्य करू नये, असे सुरुवातीलाच आयोजकांनी जाहीर केल्यानंतरही राजकीय कोपरखळ्यानी येथील ओबीसी चिंतन रंगले. वारंवार सांगूनही राजकीय भाष्य झाल्याने विजय वडेट्टीवार यांनी शेवटी दिलगिरी व्यक्त केली. (Political speeches in OBC conference)

राज्याचे माजी ऊर्जा मंत्री आणि भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekahr Bawankule) यांनी समारोपाच्या दुसऱ्या सत्रात भाषण केले. त्यानंतर भाषण करायला उभे झालेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी बावनकुळे यांना चांगलेच चिमटे काढले. त्यांच्या चिमट्यांमध्येही ओबीसी म्हणून त्यांच्यावर कसा अन्याय झाला, हेच पटोले यांनी सांगितले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत बावनकुळे यांना भाजपने उमेदवारी नाकारल्याने त्यांच्यावर झालेल्या अन्यायामुळे ओबीसी समाजातील कार्यकर्त्यांना प्रचंड दुःख झाल्याचे पटोले यांनी सांगताच बावनकुळेही थोडे भावूक झाले होते. हे सांगताना ओबीसींचे नेतृत्व कसे चिरडून टाकण्यात येत आहे, हेसुद्धा पटोले यांनी सांगितले. 

वाचा या बातम्या : फडणवीसांच्या राजकीय संन्यासाला खडसे यांचा विरोध

ओबीसी असल्यामुळे महसूल खाते मिळाले नाही : वडेट्टीवार यांची खंत

भाजपचे आंदोलन ओबीसींसाठी की सत्तेसाठी : रोहित पवार यांचा सवाल

आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका व्हायला नको, यात कुणाचं दुमत नाही. पण काही लोकं स्वतःला संविधानापेक्षा मोठं समजतात, त्याचे फळं आपल्याला भोगावे लागतात आणि आपण ती भोगतही आहोत. आपण ओबीसी एकत्र राहिलो तर कुणीच आपले काही बिघडवू शकत नाही, असेही पटोले यांनी बावनकुळे आणि पंकजा मुंडे यांना उद्देशून म्हणाले. 

आज एससी, एसटीचं आरक्षण काढलं, तर ते सरकार विरोधात रस्त्यावर उतरतात, आपल्या बारा बलुतेदारांमध्ये ती ताकद नाही का? असा प्रश्न करीत बावनकुळे साहेब, आपलं आपल्याला करायचं आहे. दुसरे नाही करणार, असा टोला नानांनी फडणवीस यांचे नाव न घेता त्यांना लगावला. 

पुढच्या काळात कुठल्याही राजकीय पक्ष ओबीसी / व्हीजेएनटीच्या वाट्याला गेले तर त्यांना आडवं पाडल्याशिवाय राहणार नाही. शेवटी आपण सगळे फडणवीसांच्या नेतृत्त्वात केंद्र सरकारकडे जावू, असा शेवटचा टोला हाणून नानांनी आपले भाषण संपवले. 

एकंदरीतच काय तर ओबीसींच्या विचारपीठावरून राजकिय टोमणे देण्याचा आणि चिमटे काढण्याचा कार्यक्रम आला. त्यामुळे यापुढेही विविध राजकीय पक्षांतील नेते ओबीसी म्हणून एकत्र राहातील का की पक्षीय राजकारणात ओबीसींना विसरतील, हे येणारा काळ च ठरवणार आहे. एक मात्र खरे की, या शिबिराने ओबीसी आरक्षणाच्या लढ्यात जान मात्र फुंकली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख