फडणवीस नागपुरात कोणाचा पत्ता कापणार, याचीच उत्सुकता

निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसमध्ये लढणार कोण, यापेक्षा भाजपमध्ये जाणार कोण, याचीच अधिक चर्चा नागपूर महानगरात आहे. दुसरीकडे, मागील विधानसभा निवडणुकीत विजयी षटकार खेचणाऱ्या भाजपला यंदाही कुठलीच रिस्क घ्यायची नसली, तरी काही बनचुकेपणा करणाऱ्या आमदारांना डच्चू देणार असल्याच्या वार्तेने अनेकांची धाकधूक वाढली आहे.
फडणवीस नागपुरात कोणाचा पत्ता कापणार, याचीच उत्सुकता

निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे. रोज बड्या बड्या नेत्यांचे प्रवेश होत आहेत, त्यामुळे कॉंग्रेस चांगलीच धास्तावली आहे, कार्यकर्ते सैरभैर आहेत. मात्र, आजच्या परिस्थितीत कॉंग्रेसतर्फे शहराध्यक्ष विकास ठाकरे पश्‍चिम नागपूर, ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल गुडधे दक्षिण-पश्‍चिम, विशाल मुत्तेमवार दक्षिण नागपूर, अभिजित वंजारी पूर्व नागपूर, नितीन राऊत उत्तर नागपूर, अनिस अहमद मध्य नागपूर हेच उमेदवार राहण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दक्षिण-पश्‍चिम नागपूरमधून आपणच लढणार असल्याचे जाहीर करून वेगवेगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. ते मुंबईतून आणि त्यांच्या मतदारसंघातून संदीप जोशी लढणार, अशी चर्चा वर्षभरापासून होती. आमदार सुधाकर देशमुख यांनी सलग दोनदा भाजपला पश्‍चिम जिंकून दिले. मात्र, पश्‍चिम नागपूरचा उमेदवार अद्यापही ठरला नाही, असे भाजपचेच पदाधिकारी खासगीत सांगतात. येथे कॉंग्रेसमधून उमेदवार आयात केला जाणार असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. दक्षिण नागपूरमध्ये माजी आमदार मोहन मते यांनी कार्यक्रमांचा धडका लावला आहे. ते काहीच स्पष्ट बोलत नसले, तरी त्यांना पक्षाने संकेत दिल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे, मतदारसंघाला पुरेसा वेळ देण्यासाठी येथील आमदार सुधाकर कोहळे यांना शहराध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त केल्याचा दावा केला जात आहे. 

प्रवीण दटके यांची मध्य नागपूरमधून लढण्याची इच्छा लपून राहिलेली नाही. त्यांनी यापूर्वीसुद्धा तिकीट मागितले होते. आता शहराध्यक्ष करून त्यांचे हात बळकट केल्याचे बोलले जाते. उत्तर नागपूरमध्ये आमदार असतानाही भाजपला अद्याप आपला जम बसवता आलेला नाही. लोकसभेच्या मतांवरून हे दिसून येते. डॉ. मिलिंद माने कॉंग्रेस-बसपच्या मतविभाजनामुळे निवडून आले होते. त्यात बसपच्या उमेदवाराची मोठी भूमिका होती. हा फॉर्म्युला या वेळी किती उपयोगी पडतो, हे दिसूनच येणार आहे. लोकसभेत गडकरी यांना सर्वाधिक मताधिक्‍य मिळवून देणारे पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांची उमेदवारी निश्‍चित मानली जात आहे. 

कॉंग्रेसचे सोपस्कार पूर्ण 

कॉंग्रेसने इच्छुकांच्या मुलाखतींचे सोपस्कार पार पाडले. जे दावेदार आहेत त्यांनीच मुलाखती घेतल्याने या सोपस्कारावरही आक्षेप घेतले जात आहेत. अनेकांनी मुलाखतीही दिल्या नाहीत. कॉंग्रेसचे नवनियुक्त कार्याध्यक्ष, तसेच माजी मंत्री नितीन राऊत यांनी कॉंग्रेस भवनाची पायरीही चढली नाही. त्यांच्या समर्थकांनीही मुलाखती दिल्या नाहीत. त्यामुळे नेहमीप्रमाणे याही वेळी कॉंग्रेसच्या उमेदवारास शेवटच्या क्षणापर्यंत एबी फॉर्मसाठी झुंजावे लागेल आणि दिल्ली-मुंबईत चकरा माराव्या लागणार असल्याचे दिसून येते. 

2009, 2014 मधील विजयी उमेदवार, त्यांची मते आणि 2019 मधील लोकसभा निवडणुकीतील मते

(मतदारसंघ, आमदार, पक्ष, मिळालेली मते, 2019 मध्ये आघाडी घेणाऱ्या पक्षाची मते.) 

दक्षिण-पश्‍चिम - देवेंद्र फडणवीस - 89,258 - भाजप, देवेंद्र फडणवीस - 1,13,918 - भाजप, 1,20,185 (भाजप). 
दक्षिण नागपूर - दीनानाथ पडोळे - 69,711 - कॉंग्रेस, सुधाकर कोहळे - 81,224 - भाजप, 1,14,945 (भाजप). 
पूर्व नागपूर - कृष्णा खोपडे - 88,814 - भाजप, कृष्णा खोपडे - 99,136 - भाजप, 1,35,451 (भाजप). 
उत्तर नागपूर - नितीन राऊत - 27,929 - कॉंग्रेस, डॉ. मिलिंद माने - 68,905 - भाजप, 96,691 (कॉंग्रेस). 
मध्य नागपूर - विकास कुंभारे - 56,312 - भाजप, विकास कुंभारे - 87,523 - भाजप, 96,340 (भाजप). 
पश्‍चिम नागपूर - सुधाकर देशमुख - 59,955 - भाजप, सुधाकर देशमुख - 86,500 - भाजप, 1,02,916 (भाजप). 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com