Nagpur politics | Sarkarnama

नक्षल घटनांना "ठेकेदार राज' जबाबदार : दिग्विजय सिंग 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 26 एप्रिल 2017

छत्तीसगडमधील सुकमामध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यासाठी त्या राज्यात सुरू असलेले "ठेकेदार राज' जबाबदार असल्याचा आरोप कॉंग्रेसचे महासचिव व मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांनी केला. 

नागपूर : छत्तीसगडमधील सुकमामध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यासाठी त्या राज्यात सुरू असलेले "ठेकेदार राज' जबाबदार असल्याचा आरोप कॉंग्रेसचे महासचिव व मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांनी केला. 

छत्तीसगडमधील नुकत्याच झालेल्या नक्षल हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी तसेच जखमी जवानांची विचारपूस करण्यासाठी दिग्विजय सिंग नुकतेच रायपूरला गेले होते. तेथून परत आल्यानंतर आज ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते. 

ते म्हणाले, की नक्षलवादी व पोलिसांमध्ये ठेकेदार दुआ असून आपल्या काळात ठेकेदार पद्धत संपुष्टात आणली होती. छत्तीसगडमध्ये आता ठेकेदार राज पुन्हा सुरू झाले आहे. तेंदू व दारूचा व्यवसाय करणाऱ्या ठेकेदारांना जोपर्यंत हद्दपार करीत नाही तोपर्यंत या समस्येवर तोडगा निघणे अशक्‍य आहे. केंद्रीय पथकात व राज्य पोलिसांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचा आरोप दिग्विजय सिंग यांनी केला. या भागातील सर्वांत जास्त त्रास आदिवासींना होतो आहे. तो एकीकडे पोलिस व दुसरीकडे नक्षलवाद्यांच्या कचाट्यात सापडला आहे. या हल्ल्याचा आपण तीव्र निषेध करतो. 

"आप'मुळे कॉंग्रेसचा पराभव 
आम आदमी पार्टीमुळे दिल्ली महापालिकांच्या निवडणुकांमध्ये कॉंग्रेसचा पराभव झाल्याचा युक्तिवाद दिग्विजय सिंग यांनी केला. भाजपला मदत करणे व कॉंग्रेसला पराभूत करणे हेच "आप'चे लक्ष्य असल्याची टीका त्यांनी केली. गोवा विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाने "आप'ला पराभूत केले होते. कॉंग्रेसने त्या राज्यात अव्वल क्रमांकाच्या जागा पटकावल्या होत्या, असेही त्यांनी या वेळी सांगितले. ईव्हीएमचा वापर बंद करून मतपत्रिकेच्या माध्यमाने निवडणूक घेण्यात याव्यात, अशी मागणी दिग्विजय सिंग यांनी केली. आजच्या आधुनिक काळात कुठलेही यंत्र हॅक करणे कठीण नसल्याचा दावा त्यांनी केला. जगातील अनेक विकसित देश ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेच्या माध्यमाने निवडणुका घेत असल्याचे सांगून भारतातही निवडणुका घेण्यात याव्यात, या मागणीचा त्यांनी पुनरुच्चार केला. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख