Nagpur politics | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

नागपूरचा आराखडा पुण्यात अडकला 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 25 एप्रिल 2017

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमधील मेट्रो रिजनचा आराखडा तब्बल आठ महिन्यांपासून पुण्यातील नगररचना संचालनालयात अडकला आहे. या आराखड्याला नगररचना संचालनालयाची मान्यता न मिळाल्याने नागपूरलगतच्या ग्रामीण भागाचा विकास रखडला आहे. 

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमधील मेट्रो रिजनचा आराखडा तब्बल आठ महिन्यांपासून पुण्यातील नगररचना संचालनालयात अडकला आहे. या आराखड्याला नगररचना संचालनालयाची मान्यता न मिळाल्याने नागपूरलगतच्या ग्रामीण भागाचा विकास रखडला आहे. 

नागपूर शहरापासून 25 किलोमीटरच्या क्षेत्रातील गावांचा विकासाचे नियोजन करण्यासाठी मेट्रोरिजन स्थापन करण्यात आले आहे. या अंतर्गत नागपूर जिल्ह्यातील 719 गावांचा समावेश होतो. यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महानगर नियोजन समिती स्थापन करण्यात आली आहे. 

मेट्रोरिजन भागातील गावांचा विकास करण्यासाठी बृहत्‌ आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्याला नगररचना संचालनालयाची मान्यता आवश्‍यक आहे. यासाठी गेल्या ऑगस्ट महिन्यात हा आराखडा नगररचना संचालनालयाकडे पाठविण्यात आला आहे. या आराखड्याला एक महिन्यात मान्यता देईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही प्रशासकीय पातळीवर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. 

पुण्यातील नगररचना संचालनालयाकडे हा आराखडा पाठविण्यात आता जवळपास आठ महिन्यांचा कालावधी उलटला आहे. नगररचना संचालनालयाने काहीही कार्यवाही केलेली नाही. नगररचना संचालनालयाची मान्यता न मिळाल्याने राज्य सरकारकडे हा आराखडा पोहोचला नाही. यामुळे मेट्रोरिजन क्षेत्रातील शेती व भूखंड खरेदी-विक्रीवर निर्बंध आले आहेत. अनेक शेतकऱ्यांना पैशाची चणचण भासत असताना खरेदी-विक्रीचा व्यवहार करता येत नाही. यामुळे या क्षेत्रातील सारे आर्थिक व्यवहार ठप्प पडले आहेत. विकासाच्या नावावर आता मेट्रो रिजनचा विळखा नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागावर पडला आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख