देशातील 100 महापौर नागपुरात येणार
ज्या शहरांमध्ये स्मार्ट सिटीचा प्रकल्प राबविला जात आहे. त्या 100 शहरातील महापौर व आयुक्त येत्या 7 व 8 एप्रिलला नागपुरात एकत्र होणार आहेत.
नागपूर : ज्या शहरांमध्ये स्मार्ट सिटीचा प्रकल्प राबविला जात आहे. त्या 100 शहरातील महापौर व आयुक्त येत्या 7 व 8 एप्रिलला नागपुरात एकत्र होणार आहेत.
नोएडातील इलेट्स टेक्नोमिडीया प्रा. लिमिटेड या पायाभूत सुविधा उभारणीच्या उद्योगातील मोठ्या कंपनीने हे शिखर संमेलन नागपुरातील एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये आयोजित केले आहे. ईलेट्स टेक्नोमिडीया आतापर्यंत दिल्ली व मुंबई सारख्या महानगरांमध्ये फाइव्ह स्टार चर्चासत्रे व इव्हेंट करणारी संस्था आहे.
नागपूरसारख्या लहान शहरात पहिल्यांदाच राष्ट्रीय पातळीवरील संमेलन आयोजित करीत आहे. स्मार्ट व सस्टेनेबल सिटी या संमेलनाचा मुख्य उद्देश आहे. स्मार्ट सिटीच्या संदर्भात विचार करण्यासाठी देशातील 100 महापौरांना निमंत्रणे पाठविण्यात आली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने होणाऱ्या या संमेलनात केंद्रीय नगरविकास मंत्री एम. वेंकय्या नायडू उपस्थित राहणार आहेत.
नागपुरात स्मार्ट सिटीचा प्रकल्प दुसऱ्या टप्प्यात राबविला जात आहे. नागपुरात सुरू असलेल्या विकास कामांचे राष्ट्रीय पातळीवर मार्केटिंग करण्याचाही यामागे हेतू आहे. यात हे शिखर संमेलन कितपत यशस्वी ठरेल, हे पुढील काळात स्पष्ट होणार आहे.

