कृषिमंत्री-आरोग्यमंत्र्यांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली : किशोर तिवारींचा घरचा आहेर

मल्टिनॅशनल कंपन्यांचे उच्चाटन करणे हाच एकमेव पर्याय आहे. नाही तर येणाऱ्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसोबत विषबाधेचे बळी ठरलेल्या शेतकऱ्यांचेही मृत्यू मोजावे लागतील - किशोर तिवारी
कृषिमंत्री-आरोग्यमंत्र्यांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली : किशोर तिवारींचा घरचा आहेर

यवतमाळ : राज्याचे कृषिमंत्री व आरोग्यमंत्र्यांच्या डोक्‍यात सत्ता गेली आहे. अधिकारी इतके मस्तावले आहेत की, ते कुणाचेच ऐकत नाहीत. त्यांना जाब विचारणारेही कुणी नाहीत. राज्याचे प्रधान सचिव व मुख्य सचिवांना बाहेर हाकलले तर त्यांना कुणी चपराशाचीसुद्धा नोकरी देणार नाही, अशी प्रतिक्रिया वसंतराव नाईक शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिली. यवतमाळ जिल्ह्यातील कीटकनाशकाने बाधित शेतकऱ्यांच्या मृत्यूचे तांडव गावोगावी जाऊन अनुभवल्यावर ते माध्यमांशी बोलत होते. राज्यमंत्र्यांचा दर्जा असलेले तिवारी यांनी सरकार आणि अधिकाऱ्यांवर प्रचंड तोंडसुख घेत सरकारला घरचा आहेर दिला.

विदर्भातील सहाशेहून अधिक शेतकऱ्यांना कीटकनाशकाची फवारणी करताना विषबाधा झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील 18 शेतकऱ्यांचा बळी गेला आहे. अनेकांना दृष्टिदोष झाला आहे. शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन कीटकनाशकाच्या बाधेने मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांची भेट घेऊन सांत्वन केले. याला जबाबदार कोण, याची जंत्रीच तयार केली. जिल्ह्यातील गावोगावचा दौरा केल्यानंतर त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.

ते म्हणाले ''राज्यमंत्र्यांना अधिकारी जुमानत नाहीत. अनेक मंत्र्यांनाही जुमानत नाहीत. महाराष्ट्राचे प्रधान सचिव, मुख्य सचिवांना बाहेर हाकलून लावले तर त्यांना साधी चपराशाची नोकरीही कुणी देणार नाही, अशी नोकरशाही काँग्रेसच्या राज्यात नव्हती. अधिकाऱ्यांवर वचक असला पाहिजे. मंत्री किती ज्ञानी आहेत व किती गंभीर आहेत, हे आधी अधिकारी बघतात. जेव्हा त्यांना काही रस नाही असे वाटते, तेव्हा अधिकारी मंत्र्यांना जुमानत नाहीत.''
 
''मल्टिनॅशनल कंपन्यांचे उच्चाटन करणे हाच एकमेव पर्याय आहे. नाही तर येणाऱ्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसोबत विषबाधेचे बळी ठरलेल्या शेतकऱ्यांचेही मृत्यू मोजावे लागतील,'' असे सूचक उद्‌गारही त्यांनी काढले.

फौजदारी गुन्हे दाखल करा
18 शेतकऱ्यांचा बळी साधी गोष्ट नाही. याची दखल शासनानेच घ्यायला हवी. बहुराष्ट्रीय कीटकनाशक कंपन्यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्याची मागणीही तिवारी यांनी केली. ते म्हणाले, ''विषबाधेत आदिवासी सर्वांत जास्त बळी पडले आहेत. याला जबाबदार असलेल्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत. कीटकनाशकांच्या विषबाधेने झालेले मृत्यू हे अपघात आहेत. त्या शेतकरी कुटुंबांना मुख्यमंत्री सहायता निधीतून तत्काळ मदत द्यायला पाहिजे. जर असेच काथ्याकूट करीत असतील व आठ दिवसांत मदत दिली गेली नाही तर याचा काहीच उपयोग होणार नाही.'' मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला तसेच उपचारासाठी तीन लाख रुपये देण्याबाबत आपण घोषणा केल्याचेही तिवारी यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com