आमदाराच्या पुतण्याने बिअरबारसाठी पाडला प्रवासी निवारा

बिअरबार राष्ट्रीय महामार्गावरून सहज दिसावा यासाठी चक्क प्रवासी निवाऱ्यावर बारमालकाने बुलडोझर चालवून तो भुईसपाट केला. भिवापूर तालुक्‍यातील राष्ट्रीय महामार्गावरील गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त गाडेघाट-घाटउमरी या गावाच्या नागरिकांसाठी हा प्रवासी निवारा बांधण्यात आला होता. यासोबतच आसपासच्या परिसरातील मोठी झाडेही तोडण्यात आली. हा बारमालक आमदाराचा पुतण्या असल्याचे माहीती आहे.
आमदाराच्या पुतण्याने बिअरबारसाठी पाडला प्रवासी निवारा

भिवापूर (नागपूर) : बिअरबार राष्ट्रीय महामार्गावरून सहज दिसावा यासाठी चक्क प्रवासी निवाऱ्यावर बारमालकाने बुलडोझर चालवून तो भुईसपाट केला. भिवापूर तालुक्‍यातील राष्ट्रीय महामार्गावरील गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त गाडेघाट-घाटउमरी या गावाच्या नागरिकांसाठी हा प्रवासी निवारा बांधण्यात आला होता. यासोबतच आसपासच्या परिसरातील मोठी झाडेही तोडण्यात आली. हा बारमालक आमदाराचा पुतण्या असल्याचे माहीती आहे. 

याबाबत बारमालक स्वप्निल पारवे यांना विचारले असता, "प्रवासी निवारा जीर्ण झाला होता, त्यामुळे तो पाडला', असे उत्तर त्यांनी दिले. शासकीय बांधकाम पाडण्याचे अधिकार आमदाराच्या पुतण्याला कुणी दिले, असा प्रश्‍न नागरीक विचारु लागले आहेत. 

नागपूर-भिवापूर राष्ट्रीय महामार्गावर तास कॉलनीच्या मागे गोसेखुर्द प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील गाडेघाट व घाटउमरी या गावांचे पुनर्वसन झाले आहे. त्यांच्या सोयीसाठी महामार्गावर प्रवासी निवारा सरकारी निधीतून बांधण्यात आला होता. या मार्गापासून थोड्याच अंतरावर स्वप्निल पारवे यांच्या बिअरबारचे बांधकाम सुरू आहे. त्याच्या बांधकामासमोर प्रवासी निवारा असल्याने तो बारमालकाला अडचणीचा ठरत होता.

बांधकाम सुरू करण्यापूर्वी हा प्रवासी निवारा सुस्थितीत होता. बांधकाम सुरू करताना प्रवासी निवाऱ्याचा मागील भाग जेसीबीने धडक देऊन पाडण्यात आला होता. आता बांधकाम पूर्णत्वास आल्यावर कुठलीही हालचाल नसल्याचे पाहून संपूर्ण प्रवासी निवारा बुलडोझरने जमीनदोस्त करण्यात आला. 

हा प्रकार दिवसा होऊनही ग्रामपंचायतीने याकडे दुर्लक्ष केले. सार्वजनिक बांधकाम विभाग, पंचायत समितीचे अधिकारी व तहसीलदार, पुनर्वसन विभागाला तर या घटनेचा मागमूसही नव्हता. 

प्रवासी निवारा जमीनदोस्त केल्यावर त्याचे कुठलेही अवशेष शिल्लक न ठेवता परिसर मोकळा व समतल करण्यात आला. रस्त्याच्या कडेची काही झाडे बारसाठी अडचणीची ठरत असल्याने त्यांचीही कत्तल करण्यात आली. एकीकडे सरकार वृक्षसंवर्धनाची मोहीम हाती घेत आहे, तर दुसरीकडे झाडांची कत्तल केलीजात असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com