nagpur-nitin-gadkari-suggests to give milk instead of cold drinks | Sarkarnama

पाहुण्यांना कोल्ड  ड्रिंक नको; दूध द्या : केंद्रीयमंत्री गडकरी

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

वाढदिवस किंवा घरातील इतर समारंभात पाहूण्यांना कोल्ड ड्रिंक ऐवजी दूध द्या, असा सल्ला केंद्रीय रस्ते विकास, जलसंधारण मंत्री नितीन गडकरी यांनी आज नगरसेवकांना दिला. त्यामुळे आता नगरसेवकांना कोल्ड ड्रिंकला नकार द्यावा लागणार आहे.

नागपूर  : वाढदिवस किंवा घरातील इतर समारंभात पाहूण्यांना कोल्ड ड्रिंक ऐवजी दूध द्या, असा सल्ला केंद्रीय रस्ते विकास, जलसंधारण मंत्री नितीन गडकरी यांनी आज नगरसेवकांना दिला. त्यामुळे आता नगरसेवकांना कोल्ड ड्रिंकला नकार द्यावा लागणार आहे.
 
राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाच्या "गिफ्ट मिल्क' या विद्यार्थ्यांसाठीच्या उपक्रमाचा शुभारंभ महानगर पालिकेची लाल बहादूर शास्त्री माध्यमिक शाळा, हनुमाननगर येथे केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. 
व्यासपीठावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, जि.प. अध्यक्ष निशा सावरकर, आमदार नागो गाणार, मनपा सत्ता पक्षे नेते संदीप जोशी, विभागीय आयुक्त अनुपकुमार, राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाचे अध्यक्ष दिलीप रथ, विदर्भ मराठवाडा दुग्ध व्यवसाय विकास प्रकल्पाचे प्रकल्प संचालक रवींद्र ठाकरे उपस्थित होते. 

मदर डेअरीच्या उपक्रमाची प्रशंसा करीत गडकरी म्हणाले, देशात 36 टक्के मुल कुपोषित आहेत. दुधामुळे कुपोषण कमी होण्यास मदत होईल. दुधाच्या वापरामुळे उत्पादनालाही चालना मिळून थेट शेतकऱ्यांना फायदा होईल. परिणामी त्याच्या आत्महत्या थांबण्यास मदत होईल. हे दुध सुगंधी व चविष्ट आहे. विद्यार्थी हे दूध पिण्यासाठी शाळेत नक्की येतील, असेही ते म्हणाले. लोकांनी विशेषत: नगरसेवकांनी विविध समारंभात पाहुण्यांना कोल्ड ड्रिंक देण्याऐवजी हे दूध दिले तर सर्वांचा फायदा होईल.

जिल्ह्यातील 21 शाळांमधील 6 हजार विद्यार्थ्यांना रोज 200 मिलीलिटर दूध प्रति विद्यार्थी देण्यात येणार असून मदर डेअरीच्या सीएसआर फंडातून हा उपक्रम चालविण्यात येत असल्याची माहिती कार्यकारी संचालक वाय. वाय. पाटील यांनी प्रास्ताविकेतून दिली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख