दाभडीत तनिष्कांची दारूबंदीनंतर जलक्रांती : अडीच हजार हेक्‍टर जमीन येणार ओलिताखाली

तेच ते दाभडी....नरेंद्र मोदी यांनी चाय पे चर्चा केली ती इथेच! यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्‍यातील दाभडी हे तीन हजार वस्तीचे गाव. 20 मार्च 2014 रोजी चर्चेत आले. मोदी गावात आले अन देशभरात दाभडी ओळखले जाऊ लागले. सार्वत्रिक निवडणुका झाल्या. मोदी पंतप्रधान झाले. दाभडीवासींच्या अपेक्षा उंचावल्या.
Dabhad
Dabhad

नागपूर : दाभडी आणि परिसरात सध्या तनिष्कांच्या कामाची, सामाजिक नेतृत्त्वाची चर्चा आहे. राजकीय वादापासून दूर असलेल्या तनिष्कांच्या प्रयत्नांना लोकसहभागाची साथ मिळाली आणि त्यांनी किमया केली. तनिष्कांच्या पुढाकाराने झालेल्या नाला खोलीकरणाच्या कामामुळे अडीच हजार हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली येईल.

तेच ते दाभडी....नरेंद्र मोदी यांनी चाय पे चर्चा केली ती इथेच! यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्‍यातील दाभडी हे तीन हजार वस्तीचे गाव. 20 मार्च 2014 रोजी चर्चेत आले. मोदी गावात आले अन देशभरात दाभडी ओळखले जाऊ लागले. सार्वत्रिक निवडणुका झाल्या. मोदी पंतप्रधान झाले. दाभडीवासींच्या अपेक्षा उंचावल्या.

पुढे  तीन वर्षे गेली. विरोधकांनी आंदोलने केली, पण प्रश्न तसेच राहिले.
आणि आता पुन्हा एकदा दाभडीविषयी चर्चा होतीय ती पाण्यासाठी लोकांनी दाखवलेल्या एकजुटीमुळे! हा बदल एकदम नाही झाला. चार वर्षांपूर्वी तनिष्का गटाने दारूबंदीचे अवघड काम सुरू केले. 2013 मध्ये तनिष्कांनी गावातील 38 अवैध दारूभट्ट्या नष्ट केल्या. त्यासाठी त्यांनी कडवा संघर्ष केला. एवढेच करून त्या थांबल्या नाहीत, तर दाभडीनंतर आजूबाजूच्या 12 गावांत दारूबंदीसाठी जनजागृती केली. समाजबदलाचे त्यांचे काम अव्याहतपणे सुरू आहे. पाण्याची समस्या त्यांच्या लक्षात आली. गावातून वाहत असलेला महादेव नाला अरुंद आणि ठिकठिकाणी बुजलेला होता. त्यात पावसाचे पाणी न साचता दरवर्षी आजूबाजूच्या अडीच हजार हेक्‍टरवरील पिकांची नासाडी होत होती. पाणी जमिनीत जिरत तर नव्हतेच; पण शेतांमध्ये जाऊन नुकसान होत होते. त्यामुळे 50 शेतकरी त्रस्त झाले होते.

ही समस्या जेव्हा शेतकऱ्यांनी तनिष्कांकडे मांडली, तेव्हा त्यांनी 'सकाळ रिलीफ फंडा' मधून नाल्याचे खोलीकरण, रुंदीकरण करण्याचे ठरविले. मागील वर्षी यासंबंधी दाभडी आणि तालुक्‍याच्या गावी जागृती केली. लोकसहभाग मिळविला. व 'सकाळ रिलीफ फंड' मधून दोन लाख रुपये मंजूर झाले. ही सगळी जुळवाजुळव करून काम सुरू होण्याचा दिवस उजाडला; पण ऐन वेळी पाऊस सुरू झाला. त्यामुळे गेल्या वर्षी हे काम सुरू होऊ शकले नाही. पण, या वर्षी तनिष्कांनी जिद्दीने 10 मे रोजी "सकाळ रिलिफ फंडा'तून काम सुरू केले. वनाधिकारी, व्यावसायिक,बांधकाम व्यावसायिक , आजी-माजी नगराध्यक्ष आदींनी 80 हजार रूपये दिले. एका व्यावसायिकाने जेसीबी मशिन दिले. जिल्हाधिकारी सचिंद्रप्रताप सिंह यांनीही भेट दिली. जलयुक्त शिवार योजनेतून 10 लाख रुपये देण्याची सूचना त्यांनी जिल्हा कृषी अधीक्षक गायकवाड यांना दिली. लवकरच हा निधी मिळणार आहे. नाम फाउंडेशनने तनिष्कांच्या कामाला दाद म्हणून दहा दिवसांसाठी एक जेसीबी मशीन उपलब्ध करून दिले. नाल्याचे नऊ किलोमीटरचे काम पूर्ण झाले.

राजकीय वादापासून तनिष्का दूर...
मोदींची 'चाय पे चर्चा' झाल्यानंतर ते सत्तेत आल्यानंतर एक वर्षाने 20 मार्च 2015 रोजी काँग्रेसच्या नेत्यांनी मोदींना आठवण करून देण्यासाठी दाभडीत 'काळा चहा' वाटला होता. त्या वेळी खासदार राज बब्बर, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, वसंत पुरके, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष मनीष पाटील, जीवन पाटील यांच्यासह काँग्रेसचे नेते दाभडीत आले होते. त्या वेळीही गावकऱ्यांनी नाल्याची समस्या मांडली होती. पण, त्याकडे कुणीही लक्ष दिले नाही. या वर्षी 10 मे रोजी तनिष्कांनी नाल्याचे काम सुरू केल्यानंतर आजी-माजी सत्ताधाऱ्यांमध्ये हालचाली सुरू झाल्या. 17 मे रोजी याच गावात केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते दोन सिमेंट रस्ते आणि नाल्यावरील पुलाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. 18 मे रोजी शिवाजीराव मोघे यांनी मोदींना दाभडीतील 'चाय पे चर्चा' ची पुन्हा आठवण करून देण्यासाठी दिल्लीला जंतरमंतरवर आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या नुकसानीबद्दल मात्र तीन वर्षांत कुणीच काही केले नाही. माया इंगळे, सुर्यकांता इंगळे, आशा मानकर, निर्मला बागेश्‍वर, वंदना शिंदे, लिलाबाई भुरे, गोपाबाई राठोड, सुशील हरवारे, शेवंता नारनवरे या तनिष्कांनी मात्र या राजकीय वादंगात न पडता पुढाकार घेऊन नाल्याचे काम केले, त्याचे कौतुक होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com