राष्ट्रवादीचा सूचक शिवसेनेने पळविला; कन्हान पोलिसात तक्रार

दोन उमेदवाराला एक सूचक असल्याने राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे नामांकन अपात्र घोषित करण्यात आले आहे. यामुळे संतापलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी याची तक्रार पोलिसात केली आहे. शिवसेनेच्या उमेदवाराने सूचकाची खोटी स्वाक्षरी मारली असा आरोप त्यांनी केला आहे. त्यापूर्वी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची महाविकास आघाडी रात्री झाली अन्‌ दिवसा मोडली, असा प्रकार झाल्याचीही चांगलीच चर्चा आहे.
NCP Seconder Kidnapped by Shivsena In Nagpur
NCP Seconder Kidnapped by Shivsena In Nagpur

टेकाडी,(नागपूर )  : निवडणुकीच्या धामधुमीत उमेदवार पळवापळविची अनेक प्रकरणे पुढे आली आहेत. परंतु, कन्हान नगर परिषदेच्या निवडणुकीत चक्क पक्षाचा सूचकच प्रतिस्पर्धी पक्षाने पळविल्याची घटना समोर आली असून याची रितसर तक्रार कन्हान पोलिसात करण्यात आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सूचक शिवसेनेने पळविल्याची सध्या कन्हान शहरात जोरदार चर्चा रंगली आहे.

दोन उमेदवाराला एक सूचक असल्याने राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे नामांकन अपात्र घोषित करण्यात आले आहे. यामुळे संतापलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी याची तक्रार पोलिसात केली आहे. शिवसेनेच्या उमेदवाराने सूचकाची खोटी स्वाक्षरी मारली असा आरोप त्यांनी केला आहे. त्यापूर्वी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची महाविकास आघाडी रात्री झाली अन्‌ दिवसा मोडली, असा प्रकार झाल्याचीही चांगलीच चर्चा आहे. राष्ट्रवादीचा गेम केल्याचा आरोप राष्ट्रवादी पदाधिकारी चंद्रशेखर भीमटे यांनी लावला आहे.

या प्रकरणाची तक्रारत रवींद्र चरणसिंग महाकाळकर यांनी केली आहे. त्यानुसार, प्रभाग चारसाठी राष्ट्रवादी पक्षाकडून निवणुकी लढवत असलेल्या उमेदवार सूर्यभान फरकाडे यांना उमेदवारीच्या नामांकन पत्रकावर गुरुवारी सूचक म्हणून रवींद्र महाकाळकर यांनी कागदपत्र जोडून स्वाक्षरी केली. फरकाडे यांनी शुक्रवारी निवडणूक अधिकारी वंदना सवरंगपते यांच्याकडे नामांकन दाखल केले. याच प्रभागातून शिवसेनेकडून महिला उमेदवार नंदा सुभाष घोगले यांनीही रवींद्र महाकाळकर यांची सूचक म्हणून सहीनिशी कागदपत्र जोडून नामांकन दाखल केले. काल नामनिर्देशन पत्रांची रितसर छाणनी झाली यात फरकाडे व घोगले या दोन उमेदवारांचा सूचक रवींद्र महाकाळकर हा एकच असल्याने घोळ झाला. सर्वप्रथम नामांकन नंदा घोगले यांनी दाखल केल्याने निवडणूक अधिकारी यांनी नियमांचा आधार घेत फरकाडे यांचा अर्ज बाद केला.

मीच राष्ट्रवादीचा सूचक

निवडणूक अधिकारी यांच्याकडे महाकाळकर यांनी मीच सूचक असल्याचे स्पष्टीकरण दिले. फरकाडे यांच्या अर्जावर असलेली स्वाक्षरी माझीच असल्याची कबुली निवडणुक अधिकाऱ्यांना दिली. तर घोगले यांनी चुकीच्या पद्धतीने कागदपत्र घेत खोटी स्वाक्षरी मारल्याचा आरोप केला. यावर निवडणूक अधिकाऱ्यांनी अपिलात जाण्याची सूचना केली. यावरून नंदा घोगले यांच्या विरुद्ध कन्हान पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी लेखी तक्रार केली.

राष्ट्रवादीने सुरुवातीला नगराध्यक्ष पदासह 17 उमदेवार रिंगणात उतरविण्याचे ठरविले होते. कॉंग्रेसने आमचा केसाने गळा कापला आहे, निवडणुकीत पूर्ण पॅनल लढवू शकत नसलो तरीही 13 जागांवर आम्ही आपली ताकत लावतोय. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याच्या चुकांमुळे नगराध्यक्षपद लढण्यापासून पक्ष वंचित राहणार आहे. नामांकनात जे अपात्र झालेत त्यातून राजकीय सूडाचे राजकारण सुरू आहे - चंद्रशेखर भीमटे, पदाधिकारी, राष्ट्रवादी कॉंग्रेस
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com