Nagpur municipal election Devendra Fadnavis | Sarkarnama

नागपूर महापालिकेवर मुख्यमंत्र्यांचे वर्चस्व ? 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 1 मार्च 2017

नागपूर महापालिकेत गेल्या दहा वर्षांपासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे असलेले वर्चस्व संपुष्टात येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रभाव यापुढे पाहायला मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.

नागपूर : नागपूर महापालिकेत गेल्या दहा वर्षांपासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे असलेले वर्चस्व संपुष्टात येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रभाव यापुढे पाहायला मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. 

नागपूर महापालिकेत 2007 पासून भाजपची सत्ता आहे. या काळात महापौर, उपमहापौर, स्थायी समितीचे अध्यक्ष, सत्तारूढ पक्षनेता ही महत्त्वाची पदे ठरविताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा शब्द अखेरचा राहत होता. मावळते महापौर प्रवीण दटके व स्थायी समितीचे अध्यक्ष सुधीर (बंडू) राऊत हे गडकरी यांच्या विश्‍वासातील मानले जातात. हे दोन्ही नेते महाल भागातील आहेत. याच परिसरात गडकरी यांचे निवासस्थान आहे. हे समीकरण मात्र आता बदलण्याची चिन्हे आहेत. 

महापालिकेतील सत्ताकेंद्र आता महालातून दक्षिण-पश्‍चिम नागपुरात येण्याची शक्‍यता आहे. 
भाजपच्या सत्तारूढ पक्षनेतेपदी संदीप जोशी यांची निवड झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्‍वासातील म्हणून जोशी ओळखले जातात. ते दक्षिण-पश्‍चिम विधानसभा मतदारसंघातील प्रभागातून निवडून आलेले आहेत. महापौरपदाच्या शर्यतीत विशाखा मोहोड यांचे नाव सर्वांत पुढे आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वरदहस्ताने त्यांचा राजकारण प्रवेश झाला आहे. यापुढे महापालिकेच्या राजकारणात गडकरींपेक्षा मुख्यमंत्र्यांचे थेट लक्ष राहील, हे आता स्पष्ट झाले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख