nagpur-mg-vaidya-rejectes-idea-of-congress-free-india | Sarkarnama

कॉंग्रेसमुक्त भारताची कल्पना अमान्य : मा. गो. वैद्य

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 28 सप्टेंबर 2018

देशाला कॉंग्रेसमुक्त नको तर कॉंग्रेसयुक्त भारत हवा, असे सांगून कॉंग्रेसमुक्त भारताची कल्पना अमान्य असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी राष्ट्रीय प्रवक्ता व ज्येष्ठ पत्रकार मा. गो. वैद्य यांनी आज व्यक्त केले.

नागपूर : देशाला कॉंग्रेसमुक्त नको तर कॉंग्रेसयुक्त भारत हवा, असे सांगून कॉंग्रेसमुक्त भारताची कल्पना अमान्य असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी राष्ट्रीय प्रवक्ता व ज्येष्ठ पत्रकार मा. गो. वैद्य यांनी आज व्यक्त केले.

नागपूर श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. देशात लोकशाही सुदृढ करण्यासाठी दोन पक्ष असणे आवश्‍यक आहे. त्यामुळे कॉंग्रेसमुक्त भारताची कल्पना मला मान्य नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर कॉंग्रेसला फार कमी जागा मिळाल्या. त्या वेळीही मी हीच भूमिका व्यक्त केली होती. देशात कॉंग्रेस टिकणे आवश्‍यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी कॉंग्रेसमुक्त भारत करण्याची घोषणा केली होती. या पार्श्‍वभूमीवर मा. गो. वैद्य यांनी कॉंग्रेसमुक्त कल्पना योग्य नसल्याचे स्पष्ट केले आहे.

राममंदिरासाठी प्रतिक्षा 
अयोध्येतील जागेचा वाद संपुष्टात येऊन पुढील वर्षी राममंदिर व्हावे, ही माझी व्यक्तीगत इच्छा असली तरी हे सर्व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे. त्यामुळे पुढील वर्षी राममंदिराचे बांधकाम होईल, हे ठामपणे सांगता येत नाही. न्यायालयाच्या निर्णयाचा आपण प्रतिक्षा करावी लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गोळवलकर गुरुजींचे काही विचार कालबाह्य
गोळवलकर गुरुजींचे काही विचार "बंच ऑफ थॉट' या पुस्तकातून काढून टाकण्याचे रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या वक्तव्याचे मा. गो. वैद्य यांनी समर्थन केले. रा. स्व. संघ काळानुरूप बदलत असल्याने गोळवलकर गुरुजी यांनी व्यक्त केलेले विचार हे त्या काळातील होते. कालबाह्य झालेल्या काही विचारांमध्ये बदल होणे अपेक्षित असल्याचे वैद्य यांनी स्पष्ट केले.

रा. स्व. संघाचा कोणत्याही धर्माला विरोध नसून दुसऱ्या धर्मातील समुहाने केलेली हत्या संघाला मान्य नसल्याचे सांगून मॉब लिंचिंगचा कृतीचे समर्थन करता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परंतु मुस्लिम व्यक्तीची हत्या झाल्यानंतर चर्चा होते परंतु हिंदू व्यक्तीची हत्या झाल्यानंतर माध्यमामध्ये चर्चा होत नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख