Nagpur mayor election | Sarkarnama

नागपूरचा महापौर कोण? 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात महापौरपदी कोणाची वर्णी लागणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. या स्पर्धेत विशाखा मोहोड, नंदा जिचकार व रूपा राय यांची नावे आघाडीवर आहेत. 

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात महापौरपदी कोणाची वर्णी लागणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. या स्पर्धेत विशाखा मोहोड, नंदा जिचकार व रूपा राय यांची नावे आघाडीवर आहेत. 

नागपूर महापालिकेत भाजपला दोन तृतीयांशापेक्षा अधिक बहुमत मिळाल्याने इतर कोणत्याही पक्षाची गरज भासणार नाही. यावर्षी नागपुरातील महापौरपद महिलांसाठी राखीव आहे. यामुळे कोणत्याही प्रवर्गातील महिलेची महापौरपदासाठी निवड होऊ शकते. यासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी रविवारी रात्री बैठक झाली. यात संभाव्य नावांवर चर्चा झाली. भाजपच्या एकूण 108 नगरसेवकांमध्ये तब्बल 59 महिला नगरसेविका निवडून आलेल्या आहेत. 

भाजपमध्ये अनेक महिला सक्षम व सुशिक्षित महिला निवडून आलेल्या असल्याने पक्षनेत्यांपुढेही कोणाच्या गळ्यात महापौरपदाची माळ टाकायची, याबाबत आता पेच निर्माण झाला आहे. सध्या विशाखा मोहोड, नंदा जिचकार, रूपा राय व चेतना टांक यांच्या नावांची जोरदार चर्चा आहे. याशिवाय एखादे नाव समोर येऊ शकते. यापैकी विशाखा मोहोड यांचे नाव सर्वाधिक प्रबळ मानले जात आहे. खुल्या प्रवर्गातील महिलेला संधी देण्यात यावी, अशी मागणी भाजपत होत आहे. खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण आल्यामुळे महापौरपदासाठी अनुसूचित जाती-जमाती वा ओबीसी महिलांची वर्णी लावू नये, असे मत मांडले जात आहे. 

विशाखा मोहोड या दक्षिण नागपूर विधानसभा क्षेत्रातून निवडून आल्या आहेत. त्या खुल्या प्रवर्गातील आहेत. दक्षिण नागपूरला अद्यापपर्यंत महापौरपद मिळालेले नाही. यामुळे या प्रभागाचा अधिक दावा सांगितला जात आहे. त्यांच्यासोबत रूपा राय यांच्याही नावाची चर्चा आहे. त्यांचे घराणे रा. स्व. संघाशी जुळलेले आहेत. भाजपच्या नेत्या व पॉंडेचरीच्या माजी नायब राज्यपाल रजनी राय यांच्या त्या स्नुषा आहेत. नंदा जिचकार या दक्षिण-पश्‍चिम विधानसभा मतदारसंघातील आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाला नावावर इतरांचा विरोध आहे. त्या ओबीसी प्रवर्गातील येतात. याशिवाय पूर्व नागपुरातील चेतना टांक यांचाही दावा आहे. चेतना टांक पूर्वाश्रमीच्या कॉंग्रेसच्या असल्याने त्यांना विरोध सुरू आहे

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख