Nagpur Mayor Directs Officers to Repair Roads for PM Tour | Sarkarnama

'पीएम' येताहेत रस्त्यावरचे खड्डे बुजवा : नागपूरच्या महापौरांचे आदेश

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

पंतप्रधान शनिवारी नागपूरला येत आहेत. त्यामुळे रस्त्यांवरचे खड्डे बुजवा, पाणी साचणार नाही याची दक्षता घ्या, मोकाट जणावरांना ताब्यात घ्या अन्‌ शहर स्वच्छ ठेवा, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले.

नागपूर : पंतप्रधान शनिवारी नागपूरला येत आहेत. त्यामुळे रस्त्यांवरचे खड्डे बुजवा, पाणी साचणार नाही याची दक्षता घ्या, मोकाट जणावरांना ताब्यात घ्या अन्‌ शहर स्वच्छ ठेवा, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले.

पंतप्रधान शहरात येणार असल्याने महपौरांनी अधिकाऱ्यांची आज बैठक घेतली. दोन दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक ठिकणी पाणी साचले आहे. रस्त्यांवर खड्डे पडले आहे. पाणी कुठे साचते याचा शोध घ्या. स्वच्छतेबाबत कुठलीही हयगय करता कामा नये. शहराची स्वच्छता करावी, कुठेही कचरा असणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. याव्यतिरिक्त मोकाट जनावरांसाठी आजच कोंडवाडा विभागाची गाडी फिरवून जनावरांची व्यवस्था करण्याचे व  मार्गात कुठेही जनावरांचा अडथळा येणार नाही, याचीही काळजी घेण्याचे आदेश महापौरांनी यावेळी दिले.

महापौर नंदा जिचकार यांनी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाद्वारे काय तयारी करण्यात आली आहे, याचा आढावा घेतला. अग्निशमन विभागामार्फत विमानतळ, राजभवन, मानकापूर स्टेडियम, सुभाषनगर, मुंजे चौक या ठिकाणी प्रत्येकी एक गाडी ठेवली जाणार आहे. प्रारंभी आयुक्त अभिजित बांगर यांनी पंतप्रधानाच्या दौऱ्याचा मार्ग व दौऱ्याविषयी माहिती दिली. मार्गातील रस्ता दुभाजकावर तातडीने रंगरंगोटी करणे आवश्‍यक आहे. याशिवाय विकासकामांमुळे फूटपाथांची दुरवस्था झाली आहे. त्याचीदेखील डागडुजी तातडीने करून रंगरंगोटी तसेच दिशादर्शक फलकाची दुरुस्ती तातडीने करावी, मार्गात काही ठिकाणी झाडांच्या फांद्या वाढलेल्या आहेत, आवश्‍यक त्या फांद्या छाटण्यात याव्यात, असेही आदेश आयुक्तांनी यावेळी दिले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख