आयुक्त मुंढेंविरुद्ध नागपूरचे महापोर जोशींचा एल्गार

महापौर संदीप जोशी यांनी काल दिव्यांगांसोबत घेतलेल्या बैठकीत आयुक्त तुकाराम मुंढेंना धारेवर धरले
Nagpur Mayor Sandip Joshi Up in Arms with Tukaram Mundhe
Nagpur Mayor Sandip Joshi Up in Arms with Tukaram Mundhe

नागपूर : महापौर संदीप जोशी यांनी काल दिव्यांगांसोबत घेतलेल्या बैठकीत आयुक्त तुकाराम मुंढेंना धारेवर धरले. दिव्यांगांच्या कल्याणासाठी गठीत केलेल्या समितीने दिलेल्या निर्देशांची प्रशासनाकडून दखल घेतली गेली नाही. येत्या १७ मार्चपर्यंत दिव्यांगांबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास १८ मार्चला आयुक्त कार्यालयात धडक देणार, असा इशाराही महापौरांनी दिला.

दिव्यांगासाठीही थोडा वेळ काढा, असा टोलाही महापौरांनी आयुक्तांना लावला. अचानक महापौरांनी आयुक्तांविरोधात पवित्रा घेतल्याने काहींनी आश्‍चर्य व्यक्त केले तर काहींनी 'ये तो होनाही था' अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

महानगरपालिकेचे सत्ताधारी व आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यातील संघर्ष संपूर्ण शहरवासींपुढे आला. संदीप जोशी यांनी अतिक्रमणविरोधी कारवाई, अधिकारी, कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यावरून आयुक्तांचे कौतुक केले. परंतु सभागृहात दिलेल्या निर्देशांकडे कानाडोळा केल्याने महापौर संदीप जोशी यांनीही आता आयुक्त मुंढेविरुद्ध 'एल्गार' पुकारल्याचे दिसतेय. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आर्थिक शिस्तीच्या नावावर शहरातील सर्व विकास कामे बंद केल्याचा आरोप यापूर्वी सत्ताधाऱ्यांनी केला. 

सत्ताधारी ११२ नगरसेवकांनी माजी महापौर प्रवीण दटके, दयाशंकर तिवारी यांच्या नेतृत्त्वात आयुक्तांची भेट घेऊन विकास कामांच्या फाईल्स मंजुर करण्याची मागणी केली होती. मात्र, आयुक्तांनी महापालिकेच्या आर्थिक स्थितीवर बोट ठेवत स्पष्टपणे कार्यादेश झाले, परंतु सुरू न झालेली कामे तसेच कार्यादेश न झालेली कामे करता येणार नाही, असे उत्तर दिले. याच बैठकीत सत्ताधाऱ्यांनी सभागृह सार्वभौम असते, तेथेच बघू, असा इशारा आयुक्तांना दिला होता. या बैठकीपासून महापौर संदीप जोशी अलिप्त होते.

२० फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या सभागृहात आर्थिक तरतुदीवर झालेल्या चर्चेला उत्तर देताना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी १२ वर्षांची आकडेवारी सादर करण्यासाठी ३० दिवसांचा वेळ मागितला होता. त्यावरून महापौर संदीप जोशी यांनी ३० दिवस विकास कामे थांबविणे योग्य होणार नाही, ज्या कामाचे कार्यादेश झाले, ती कामे सुरू करण्याचे निर्देश आयुक्तांना दिले होते. २८ फेब्रुवारीला मनपा सचिव कार्यालयामार्फत सभेतील निर्देश आयुक्तांकडे पाठविण्यात आले. अर्थात गेल्या चार दिवसांत किती कामांना मंजुरी दिली, किती कामांना मंजुरी शिल्लक आहे, याचा अहवाल तातडीने द्या, असे पत्रच महापौरांनी आयुक्तांना पाठविले. 

एवढेच नव्हे तर सभागृहात वित्त व लेखा अधिकारी मोना ठाकूर यांना परत पाठविण्याचे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले होते. मोना ठाकूर यांना शासनाकडे अद्याप का पाठविण्यात आले नाही? असे स्पष्टीकरणच महापौर संदीप जोशी यांनी आयुक्तांना मागितले आहे. सभेतील निर्देश आयुक्तांकडे पाठवून केवळ चार दिवसांचा कालावधी लोटला. मात्र, महापौरांनी चार दिवसांतच आयुक्तांना महापौरांच्या अधिकारांची जाणीव करून दिल्याची चर्चा यानिमित्त महापालिका वर्तुळात रंगली आहे.

आयुक्तांविरोधात नाराजीचे कारण 

महापालिकेतील ऐवजदारांना स्थायी नियुक्तीचे पत्र देण्याबाबत सुरेश भट सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी प्रशासनाला एका बैठकीत दिले होते. परंतु आयुक्तांनी नियुक्तीपत्र देणे ही प्रशासकीय बाब असल्याचे सांगून सुरेश भट सभागृह कार्यक्रमासाठी देण्यास स्पष्ट नकार दिला होता. एकप्रकारे आयुक्तांनी सत्ताधाऱ्यांच्या 'इव्हेंट संस्कृती'लाच ब्रेक लावला. आयुक्तांविरोधात महापौरांच्या नाराजीचे हे प्रमुख कारण असल्याचे सुत्राने नमुद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com