नाशिकचे नेते नागपूरकरांना म्हणतात.....तुकाराम मुंढे कसे, ते देवेंद्रजीनांच विचारा! - Nagpur Leaders Asking Nashik Leaders about Tukaram Mundhe Style of Functioning | Politics Marathi News - Sarkarnama

नाशिकचे नेते नागपूरकरांना म्हणतात.....तुकाराम मुंढे कसे, ते देवेंद्रजीनांच विचारा!

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

नवे सरकार सत्तेत आल्यावर तुकाराम मुंढे यांना थेट फडणवीसांच्या नागपूरला पाठवले आहे. त्याची तेथील नगरसेवक, नेत्यांनी चांगीलच धास्ती घेतली आहे. ते रोजच परिचित नगरसेवक, नेत्यांना फोन करुन "मुंढे कसे आहेत?. काय करतात?'' याची विचारणा करु लागले आहेत

नाशिक : तुकाराम मुंढे नागपूर महापालिकेचे आयुक्त म्हणून रुजु झाले आहेत. नागपूरचे राजकीय नेते, कर्मचाऱ्यांनी त्याचा चांगलाच धसका घेतला आहे. मुंढे याआधी नाशिकचे आयुक्त होते. नाशिक अन्‌ नागपूर योन्ही महापालिकांत भाजपची सत्ता आहे. त्यामुळे नागपूरचे नेते, कर्मचारी सध्या थेट नाशिकला फोन करुन 'मुंढे कसे आहेत?' याची विचारणा करु लागले आहे. यावर काय बोलावे असे धर्मसंकट आहे. यावर भाजपच्या काही नेत्यांनी सरळ "तुकाराम मुंढे कसे आहेत हे देवेंद्रजीनांच विचारा'' असे सांगत स्वतःची सुटका करुन घेतली आहे.

तुकाराम मुंढे यांची नाशिक महापालिकेतील कारकीर्द गाजली. त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे आणि राजकीय नेते, नगरसेवकाशी फटकून वागण्याने. महापालिकेचा निधी धार्मिक कामासाठी वापरू देणार नाही, आमदारांच्या कामांना सार्वजनिक बांधकामऐवजी महापालिकेची परवानगी बंधनकारक करणे, महासभेपेक्षा आयुक्तांचे अधिकार अधिक असल्याची भूमिका घेणे, कर्मचाऱ्यांच्या गणवेशापासून ते कार्यालयात तंबाखू वा गुटख्याचे सेवन न करणे, ऑनलाईन कामजाचा आग्रह, करवाढ, थेट जनतेत मिसळून वॉक वीथ कमिशनर उपक्रमांमुळे त्यांची कारकीर्द चांगलीच चर्चेत राहिली. त्याला व्हाईट कॉलर व मध्यमवर्गीयांचा पाठींबा मिळत असे. त्यातूनच पुढे 'नगरसेवक व मुंढे' असा संघर्ष उभा राहिला.

शहराच्या कामकाजाला दिशा व शिस्त लावण्यासाठी अन्‌ मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्‍ट मार्गी लावण्यासाठी स्वतः फडणवीसांनीच त्यांची नियुक्ती केली होती. आयुक्त मुंढेंच्या कार्यपद्धतीमुळे काही वेळा नागरिकसुद्धा मुंढे यांच्या विरोधात गेल्याने त्याचा फायदा घेत त्यांच्यावर अविश्‍वास ठरावाचा प्रस्ताव नगरसेवकांनी दाखल केला. परंतु, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची नाचक्की होईल म्हणून स्थानिक पातळीवर महापौरांशी चर्चा करून प्रस्ताव मागे घेण्यास भाग पाडले. परंतु, महापालिकेच्या इतिहासात प्रथमच आयुक्तांविरोधात अविश्‍वास दाखल करण्याची वेळ आल्याने मुंढे, लोकप्रतिनिधी वाद अगदी टोकाला गेला होता. 

पुढे फडणवीसांनीच त्यांची बदली केली. आता नवे सरकार सत्तेत आल्यावर त्यांना थेट फडणवीसांच्या नागपूरला पाठवले आहे. त्याची तेथील नगरसेवक, नेत्यांनी चांगीलच धास्ती घेतली आहे. ते रोजच परिचित नगरसेवक, नेत्यांना फोन करुन "मुंढे कसे आहेत?. काय करतात?'' याची विचारणा करु लागले आहेत. उत्तर दिले तर काय द्यावे?, नाही दिले तरी गैरसमज होतो. त्यातून सुटका करण्यासाठी 'देवेंद्रजींनाच विचारा' हा मार्ग नाशिककरांना चांगला वाटला असावा.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख