nagpur-kapil-sibbal-control-on-india-through-nagpur | Sarkarnama

नागपुरातून भारतावर नियंत्रण : कपिल सिब्बल  

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सरकार चालवित असून नागपुरातून भारतावर नियंत्रण असल्याचे नमुद करीत माजी केंद्रीयमंत्री व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी केंद्रातील सरकारवर टिकास्त्र सोडले. 

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सरकार चालवित असून नागपुरातून भारतावर नियंत्रण असल्याचे नमुद करीत माजी केंद्रीयमंत्री व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी केंद्रातील सरकारवर टिकास्त्र सोडले. 

सरकारमधील एकच व्यक्ती निर्णय घेत असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील लोकसभा निवडणुकीत 'फेक न्यूज'चा आधार मोठ्या प्रमाणात घेतला जाणार असल्याची पुस्तीही त्यांनी जोडली. 

सिव्हिल लाईन येथील प्रेस क्‍लबमध्ये ऑल इंडिया प्रोफेशनल कॉंग्रेस नागपूरतर्फे आयोजित 'कॉन्फ्लिक्‍ट इन डेमोक्रसी' यावर चर्चेत ते बोलत होते. या चर्चेत ऍड. श्रीहरी अणेही सहभागी झाले. 

ऑल इंडिया प्रोफेशनल कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष संजय झा यांनी उभय विधीतज्ज्ञांना बोलते केले. 1947 पासून अनेक पक्षांनी क्षमतेनुसार सरकार चालविले. परंतु पहिल्यांदाच देशात पक्ष आणि सरकारमध्ये कुठलाही फरक नसल्याचे निरीक्षण सिब्बल यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात नोंदविले. 

लोकशाहीतील हा बदल घातक असल्याचे नमुद करीत त्यांनी समुह हल्ले वाढले असून विध्वंसाचे नवे रुप यानिमित्त पुढे आल्याचे ते म्हणाले. 

न्यायालयाबाहेरच्या घटनांचा परिणाम न्यायव्यवस्थेवर होत असल्याचे नमुद करीत त्यांनी राजकीय हस्तक्षेपावरही बोट ठेवले. कॉंग्रेसने संविधानातील कलमाचा आधार घेत आणीबाणी लावली. मात्र, सध्या देशात अघोषित आणीबाणी सुरू असून सोशल मिडियावर व्यक्त होणाऱ्या मुलींनाही त्रास दिला जात आहे. पुस्तकांत सरकारकडून होणाऱ्या फेरफारबाबत चिंता नसून शैक्षणिक संस्थांवर ताबा मिळविणे चिंतेचा विषय आहे, असे ते म्हणाले. 

यावेळी त्यांनी यूपीए सरकारने आधार कार्डाचा ओळखपत्र म्हणून वापर व्हावा, म्हणून अस्तित्त्वात आणले. परंतु सध्याची सरकार सर्व ठिकाणी आधार बंधनकारक करीत आहे. एखाद्याला प्रवास करायचा असल्याचे तिकिटसाठीही आधार क्रमांक द्यावा लागणे म्हणजे फिरण्याच्या स्वातंत्र्यावर नियंत्रण ठेवण्याची सरकारची इच्छा असल्याचे दिसून येते. ही बाब धोकादायक असल्याचेही ते म्हणाले. 

लोकपाल नियुक्तीची मागणीही त्यावेळी राजकीय होती. एनआरसी अर्थात राष्ट्रीय नागरिक नोंदणीबाबत मानवीय दृष्टीकोन बाळगण्याची गरज असून राजकीय हित साधण्यास मुरड घालण्याच्या आवश्‍यकतेवर सिब्बल यांनी भर दिला. त्यांनी सध्या प्रसारमाध्यमे उद्योगपती चालवित असून व्यक्त होण्यासाठी सोशल मिडिया उत्तम असल्याचेही ते म्हणाले. 

यावेळी ऍड. अणे यांनी प्रसारमाध्यमातील राजीनामे सत्रातून एक शक्ती सरकारविरोधात तयार होत आहे, त्यामुळे एकदिवस निश्‍चितच त्याचे परिणाम पुढे येईल, असे सांगितले. गोहत्या बंदीवरूनही त्यांनी माझ्या किचनमध्ये काय शिजवावे, हा माझा प्रश्‍न आहे. यात लूडबूड नको, असे ते म्हणाले. 

राफेलवरून सरकारची कोंडी करणार 
राफेल खरेदीवरून केंद्र सरकारची कोंडी करण्यात येईल, असे त्यांनी कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. याबाबत न्यायालयात जाण्यास त्यांनी नकार दिला. सरकारविरोधातील नाराजीचा कॉंग्रेस फायदा घेईल, असे नमुद करीत सोशल मिडियातूनच उत्तर दिले जाईल, असेही ते म्हणाले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख