यवतमाळ मेडिकलचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात का घेतले नाही? - why cctv footage of yavatmal medical was not seized | Politics Marathi News - Sarkarnama

यवतमाळ मेडिकलचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात का घेतले नाही?

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021

तपास करणाऱ्या वानवाडी पोलिसांनी मेडिकलमधील सीसीटीव्ही फुटेज का ताब्यात घेतले नाही, असा सवाल भारतीय जनता पक्षाच्या यवतमाळ महिला जिल्हाध्यक्ष माया शेरे यांनी केला आहे.

नागपूर : पुणे शहरातील वानवाडी येथे ८ फेब्रुवारीला मरण पावलेल्या पूजा चव्हाणला २ फेब्रुवारीला यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात नाव बदलवून भरती करण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या वानवाडी पोलिसांनी मेडिकलमधील सीसीटीव्ही फुटेज का ताब्यात घेतले नाही, असा सवाल भारतीय जनता पक्षाच्या यवतमाळ महिला जिल्हाध्यक्ष माया शेरे यांनी केला आहे. 

श्रीमती शेरे म्हणाल्या की, फक्त यवतमाळ जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रभर चर्चा आहे की, त्या मुलीला २ फेब्रुवारीला यवतमाळ मेडिकलला दाखल करण्यात आले होते. नाव बदलवले असले तरी पूजा चव्हाण या नावाचा चेहरा आता सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेज जर पोलिसांनी ताब्यात घेतले असते, तर येथे दाखल केलेली मुलगी पूजा चव्हाणच होती, हे सिद्ध झाले असते. आतापर्यंतच्या तपासात पोलिसांनी तिच्या इतर वस्तू जसे मोबाईल फोन, लॅपटॉप आदी ताब्यात का घेतले नाही? त्यामुळे प्रशासनाला विचारायचे आहे की, तुम्ही कुणाच्या दबावाखाली काम करत आहात. एका मुलीवर अत्याचार झाला आहे, अन्याय झाला आहे. प्रशासन जर दबावात काम करत असेल, तर तिला न्याय केव्हा मिळणार?

जेव्हा तिला मेडिकलमध्ये दाखल केले, तेव्हाचे सीसीटीव्ही फुटेज आहेत. तिचे आधार कार्ड घेण्यात आले असेल आणि तिचे डॉक्यूमेंट तयार झालेच असतील. पण पोलिसांनी तपासासाठी काहीच ताब्यात घेतलेले नाही. प्रशासन कुठेतरी कुणालातरी दबून आहे, हे एव्हाना जनतेच्याही लक्षात आले आहे. शासन जर पोलिसांवर दबाव आणत असेल, तर हे खपवून घेतले जाणार नाही. या प्रकरणात न्याय झाला पाहिजे हीच आमची भूमिका आहे. वेळोवेळी तेच बोलण्यासाठी आम्ही पुढे आलो आहोत. आम्ही केवळ विरोधी पक्ष आहोत म्हणून मागणी करीत आहोत, असा आरोप करण्यात आला. पण केवळ विरोधी पक्ष म्हणून नव्हे तर महिलेवर अत्याचार झाला आहे. म्हणून न्याय मागण्यासाठी आम्ही पुढे आलो आहोत, असे माया शेरे म्हणाल्या. 

डम्प डाटा का काढला नाही ?
या प्रकरणात सरकार याच पद्धतीने तपास करणार असेल तर येत्या दोन-तीन दिवसांत आम्ही न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरणार आहोत. सीबीआय चौकशीची मागणीही आम्ही करू. पोलिस खरंच प्रामाणिकपणे चौकशी करीत असतील तर आतापर्यंत डम्प डाटा काढायला हवा होता. आज आठ दिवस उलटूनही डम्प डाटा काढला गेला नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे की, तो मॅनेज करण्यासाठी वेळ दिला जात आहे, असा आरोपही माया शेरे यांनी केला. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख