भंडारा : पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे दर आकाशाला भिडले आहेत. देशात जेव्हा मनमोहन सिंह यांचं सरकार होतं, त्यावेळी अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार ट्विटरच्या माध्यमातून सातत्याने टिका करायचे. आता नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये महागाईने जनता हवालदिल झाली असताना त्यांची टिव टिव का बंद झाली, असा सवाल महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले आज येथे केला.
नाना पटोले कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर आज प्रथमच भंडारा जिल्ह्यात त्यांचे आगमन झाले. यावेळी कार्यकत्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. फटाक्यांची आतषबाजी करुन जेसीबीने त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांचे सिनेमे किंवा त्याचे शूटींग आता आम्ही महाराष्ट्रात चालू देणार नाही. मनमोहन सिंह यांचे सरकार असताना या अभिनेत्यांना जनतेवरचा अन्याय, अत्याचार दिसत होता. त्यावर टिका करताना ते फार टिव टिव करायचे. आता नरेंद्र मोदी सरकार शेतकऱ्यांवर, सामान्य जनतेवर दररोज अत्याचार करीत आहे. आता या अभिनेत्यांना तो दिसत नाहीये का? मोदी सरकारच्या अत्याचाराच्या विरोधातही या अभिनेत्यांनी आता आवाज उचलावा आणि जनतेच्या बाजूने उभे रहावे, अन्यथा महाराष्ट्रात त्यांचे सिनेमे आणि शूटींग होणार नाही, याची पूर्ण व्यवस्था आम्ही करू, असा सणसणीत इशारा नाना पटोलेनी दिला आहे.
शेतकऱ्यांच्या आणि जनतेच्या प्रश्नासाठी मी नेहमीच आक्रमक राहिलो आहे. मोदी सरकारने आज देश विकायला काढला आहे. देशातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर फास्टटॅगची सक्ती करून लोकांच्या खिशातील पैसा लुटण्याचे काम सुरू आहे. जनतेचे खिसे कापण्याचे काम करण्यासाठीच हे सरकार आणण्यात आलं आहे. सत्तेवर येण्यापूर्वी मोदींनी जी भूमिका देशवासीयांसमोर मांडली होती, त्या भूमिकेला फाटा देण्यात येत आहे. सरकारच्या अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात कॉंग्रेस आता अधिक आक्रमक झाली असल्याचे नाना पटोले म्हणाले.
राज्य सरकारच्या नेत्यांवर गेल्या काही दिवसांत गंभीर आरोप विरोधी पक्षाकडून केले जात आहे. याबाबत बोलताना नाना म्हणाले, केवळ आरोप करणे आणि तशी वस्तुस्थिती असणे, या दोन भिन्न गोष्टी आहे. येथे एक सांगता येईल की, सुशांतसिंह राजपूत प्रकरणात कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये जेव्हा जनता आपआपल्या घरांमध्ये होती. त्यावेळी त्याची आत्महत्या नसून हत्या आहे, असे तीन महिन्यांपर्यंत टीव्हीवर लोकांना दाखवण्यात आले. त्यानंतर ते प्रकरण सीबीआयच्या चौकशीत नेण्यात आले. त्यानंतर त्या प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल येणे अपेक्षित होते. पण तो अहवाल आला नाही. कारण त्यामध्ये भारतीय जनता पक्षातील मोठे नेते गुंतलेले होते. त्यामुळे त्याचा अहवाल दिला गेला नाही. यावरून त्या प्रकरणाची वस्तुस्थिती काय होती आणि आहे, हे लक्षात येते. महाविकास आघाडीतील मंत्र्यांच्या विरोधात जे आरोप केले जात आहेत, ते केवळ आरोप आहेत. त्यातील वस्तुस्थिती जेव्हा समोर येईल, त्यावेळी कॉंग्रेस आपली भूमिका मांडणारच आहे, असे नाना म्हणाले.
कोरोनाच्या नियमांना तिलांजली
दिल्लीच्या सिमांवर आंदोलन करीत असलेल्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ लाखनीतून ट्रॅक्टर रॅली व पदयात्रा काढण्यात आली. यादरम्याने सर्वत्र सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडाला होता. नाना पटोलेंसह कार्यकर्त्यांना मास्क घालण्याचा विसर पडल्याचे चित्र दिसत होते. दोन दिवसांपूर्वी भंडारा जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनावाढिचे संकेत देत गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यातील महाशिवरात्री व शिवजयंती यात्रा रद्द करण्याचा आदेश देण्यात आला होता. पण रॅलीदरम्यान कार्यकर्यांवर कुणाचेही नियंत्रण नव्हते.
Edited By : Atul Mehere

