वडेट्टीवार म्हणाले, भाजपची अशी डझनभर प्रकरणं सांगता येतील… - wadettiwar said that dozens of such cases of bjp can be told | Politics Marathi News - Sarkarnama

वडेट्टीवार म्हणाले, भाजपची अशी डझनभर प्रकरणं सांगता येतील…

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021

बंजारा समाजाचे संत सुनील महाराज यांनी सांगितले की, राठोड यांनी राजीनामा दिलेला नाही आणि येत्या गुरुवारी पोहरादेवी येथे माध्यमांशी बोलून ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

नागपूर : पूजा चव्हाण नामक २२ वर्षीय तरुणीचा पुणे शहराच्या वानवाडी परिसरात मृत्यू झाल्यानंतर राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचा थेट संबंध त्या घटनेशी जोडण्यात आला. विरोधी पक्षाने त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करायचेच, असे ठरवलेले दिसतेय. असे असेल तर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची अशी डझनभर प्रकरणं सांगता येतील, असे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आज म्हणाले. 

वडेट्टीवार म्हणाले, संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिल्याची माहिती मिळतेय. एखाद्याविषयी टोकाची भूमिका घेतली तर काय होऊ शकते, हे या प्रकरणावरून लक्षात येते. संजय राठोड यांच्याबाबत मिडिया ट्रायल सुरू आहे. खरं तर मृतक पूजाच्या वडिलांनीही तिच्या मृत्यूबाबत परिस्थिती मिडियाला सांगितली आहे. संजय राठोड यांच्या या प्रकरणातील सहभाग सर्वांनी नाकारला आहे. कुटुंबातूनही कुणाची तक्रार नाही. तरीही राठोड यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी महाविकास आघाडी सरकारची भूमिका आहे. चौकशी झाल्यानंतर सत्यता बाहेर येईल आणि त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल. 

मुख्यमंत्र्यांनी या विषयात भूमिका मांडली आहे. कुठल्याही विषयात महाविकास आघाडी सरकारची भूमिका स्पष्ट असते. असे असतानाही सरकारवर प्रश्‍न उपस्थित करणे चुकीचे आहे. भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत सांगायचे झाल्यास महिलांबाबत त्यांच्या नेत्यांची डझनभर प्रकरणं सांगता येतील. तिथे मात्र नैतिकता, नीतिमत्ता राहणार नाही. संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिला आहे. प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. त्यामुळे लवकरच दूध का दूध और पानी का पानी’ होणार आहे, असे मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले. 

संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला की नाही, ही बाब आज स्पष्ट झाली नव्हती. पण आता महाविकास आघाडी सरकारमधील महत्वाच्या मंत्र्यांनीच तसे सांगितले आहे. त्यामुळे राठोड यांचा राजीनामा मंजूर होतो की नामंजूर, अशी चर्चा सुरू असताना बंजारा समाजाचे संत सुनील महाराज यांनी सांगितले की, राठोड यांनी राजीनामा दिलेला नाही आणि येत्या गुरुवारी पोहरादेवी येथे माध्यमांशी बोलून ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्यामुळे संजय राठोड यांच्याबाबतीतील प्रत्येक उत्तरासाठी आता गुरुवारची प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

दरम्यान शिवसेनेची राज्यस्तरीय बैठक आज मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यामध्ये राठोड प्रकरणावर चर्चा होणे अपेक्षित होते. पण बैठकीत या विषयावर चर्चा झालीच नाही, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता हे ‘हाय प्रोफाईल प्रकरण’ पुढे कोणते वळण घेणार, याकडे राज्यभरातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.  
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख