पहिली सामूहिक आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबाला घरूनच द्यावी श्रद्धांजली ! - tribute to the farmer family who committee the first mass suicide | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

पहिली सामूहिक आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबाला घरूनच द्यावी श्रद्धांजली !

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 17 मार्च 2021

जिल्हा प्रशासनाने प्रत्यक्ष कार्यक्रमाला परवानगी नाकारली असली तरीही हा कार्यक्रम आता ऑनलाइन होणार आहे. किसान पुत्र आंदोलनाशी जुळलेल्या सर्वांनी, शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांप्रति कृतज्ञता करण्याची इच्छा बाळगून असलेल्या प्रत्येकाने या ऑनलाइन श्रद्धांजली कार्यक्रमात सहभागी व्हावे.

नागपूर : यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव तालुक्यातील चिलगव्हाण येथे प्रगतिशील शेतकरी साहेबराव करपे पाटील यांच्या कुटुंबाने १९ मार्च १९८६ ला सामूहिक आत्महत्या केली होती. या घटनेची पहिली सामूहिक शेतकरी आत्महत्या असल्याची नोंद शासन दप्तरी झाली होती. तेव्हापासून याच दिवशी करपे कुटुंबीयांना श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम घेतला जातो. पण यावर्षी कोरोनाच्या उद्रेकामुळे प्रशासनाने कार्यक्रमाला परवानगी दिली नाही. त्यामुळे १९ मार्चला सर्वांनी आपआपल्या घरुनच करपे कुटुंबीयांना श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहन किसान पुत्र आंदोलनाचे संयोजक मनिष जाधव यांनी केली आहे. 

आजही शेतकऱ्यांच्या आत्महत्येची धग कायम आहे. केंद्र सरकारचे शेतकरीविरोधी कायदे याला जबाबदार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय करणारे तिन्ही काळे कायदे रद्द करावे, अशी मागणी शुक्रवारी १९ मार्चला करण्यात येणार होती. पण प्रशासनाने परवानगी न दिल्यामुळे आता केवळ पाच लोकांमध्ये हा कार्यक्रम आटोपावा लागणार आहे. या कार्यक्रमाला कलावंत मकरंद अनासपूरे, साहित्यिक हरीष ईथापे यांच्यासह इतर साहित्यिक कवी येणार होते. सप्तखंजीरी वादक सत्यपाल महाराजांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम, शेतकरी चिंतन शिबिर आणि चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. पण प्रशासनाने परवानगी नाकारल्यामुळे हे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे आता नागरिकांना जेथे कुठे असतील, घरांत किंवा शेतांमधून करपे यांच्या कुटुंबीयांना श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. 

जिल्हा प्रशासनाने प्रत्यक्ष कार्यक्रमाला परवानगी नाकारली असली तरीही हा कार्यक्रम आता ऑनलाइन होणार आहे. किसान पुत्र आंदोलनाशी जुळलेल्या सर्वांनी, शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांप्रति कृतज्ञता करण्याची इच्छा बाळगून असलेल्या प्रत्येकाने या ऑनलाइन श्रद्धांजली कार्यक्रमात सहभागी व्हावे. औंढा नागनाथ येथून पदयात्रेचे देखील आयोजन करण्यात आले होते. पण या पदयात्रेत अमर हबीब, मनिष जाधव यांच्यासह पाचच लोक असणार आहे. यावर्षी चिलगव्हाण येथे कुणीही येऊ नये. आपआपल्या घरुनच शेतकऱ्यांचे मनोबल वाढवणाऱ्या या कार्यक्रमात नागरिकांना सहभागी व्हावे, असेही कळवण्यात आले आहे. या कार्यक्रमाची लिंक समाजमाध्यमांवरून सर्व संबंधितांपर्यंत पोहोचवण्यात येणार असल्याचे मनिष जाधव यांनी सांगितले. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख