...तर वेकोलिचे कोळसा उत्पादन बंद पाडू : आमदार किशोर जोरगेवार - then will stop coal production of wcl said mla kishor jorgewar | Politics Marathi News - Sarkarnama

...तर वेकोलिचे कोळसा उत्पादन बंद पाडू : आमदार किशोर जोरगेवार

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 15 फेब्रुवारी 2021

चंद्रपुरात काम करायचे असेल तर येथील भूमिपुत्रांना रोजगार द्यावाच लागेल, अन्यथा तुमचे काम बंद पाडू, असा इशारा आमदार किशोर जोरगेवार यांनी वेकोलि प्रशासनाला दिला आहे. याचा परिणाम कोळसा उत्पादनावर झाला, तर ती जबाबदारी तुमची असेल, असेही त्यांनी ठणकावले.

नागपूर : कोळसा, पाणी, जागा आमची आणि रोजगार बाहेरच्यांना, असा प्रकार वेकोलित अंतर्गत चालणा-या खाजगी कंपन्यांमध्ये सुरू आहे. मात्र आता हे चालू देणार नाही. चंद्रपुरात काम करायचे असेल तर येथील भूमिपुत्रांना रोजगार द्यावाच लागेल, अन्यथा तुमचे काम बंद पाडू, असा इशारा आमदार किशोर जोरगेवार यांनी वेकोलि प्रशासनाला दिला आहे. याचा परिणाम कोळसा उत्पादनावर झाला, तर ती जबाबदारी तुमची असेल, असेही त्यांनी ठणकावले. 

वेकोलि अंतर्गत चालणा-या विविध खाजगी कंपन्यांमध्ये स्थानिकांना रोजगार द्या, या मागणीसाठी आज आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात यंग चांदा ब्रिगेडच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे शहर संघटक कलाकार मल्लारप, आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, शहर महिला आघाडीच्या शहर संघटिका वंदना  हातगावकर, विश्वजित शहा, अमोल शेंडे, साहिली येरणे, दुर्गा वैरागडे, तापूष डे, नितीन शहा, रुपेश कुंदोजवार, विनोद अनंतवार, विलास वनकर, हरमन जोसेफ, नितीन शहा, तिरुपती कालेगुरवार, आनंद रणशूर, राजेश वर्मा, आदी गिर्वेनी , दिनेश इंगळे आदींची उपस्थिती होती.

चंद्रपूर हे औद्योगिक शहर म्हणून ओळखले जाते. येथे सर्वत्र वेकोलिचे जाळे पसरले आहे. याचा मोठा परिणाम प्रदूषणाच्या माध्यमातून चंद्रपूरकरांना सोसावा लागत आहे. असे असले तरी या उद्योगांमध्ये स्थानिकांना रोजगार दिला जात नाही. परिणामी उद्योग असूनही येथे बेरोजगारीचे प्रमाण अधिक आहे. त्यामूळे वेकोलि अंतर्गत चालणा-या विविध खासगी कंपन्यांमध्ये स्थानिकांना रोजगार द्या, या प्रमुख मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला.  दुपारी १२ वाजता या मोर्चाला गांधी चौकातून सुरुवात झाली. त्यानंतर शहराच्या मुख्य मार्गाने मार्गक्रमण करीत हा भव्य मोर्चा वेकोलि प्रशासनाविरोधात नारेबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चात चंद्रपूर शहरासह ग्रामीण भागातून मोठ्या संख्येत नागरिक सहभागी झाले होते.

यावेळी संबोधित करताना आमदार जोरगेवार म्हणाले कि, चंद्रपुरात कोळसा, जागा, पाणी, विद्युत या सर्व गोष्टी पूरक प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे येथे उद्योग आले. यातून येथील बेरोजगारी दूर होईल, अशी अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही. येथील नोक-यांमध्ये नेहमीच भूमिपुत्रांना डावलण्यात आले. परिणामी उद्योग असूनही येथील युवक हा बेरोजगार राहिला आहे. वेकोलि अंतर्गत विविध खाजगी कंपन्या काम करत आहेत. या कंपन्यांमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत आहे. परंतु येथे काम करण्यासाठी बाहेरून कामगार आणले जातात. त्यामूळे आमच्या हक्काच्या नोक-यांपासून आम्हालाच वंचित राहावे लागत आहे. मात्र यापुढे हे खपवून घेतले जाणार नाही. मायनिंग सरदार व फायरमॅनच्या रिक्त जागा कोलकाता येथे भरून तेथील युवकांना चंद्रपुरात पाठविण्याचे कट रचले गेले होते. 

या विरोधात नागपूर येथील वेकोलिच्या सिएमडी कार्यालयावर मोर्चा काढून येथील युवकांनाच रोजगार द्या, अशी मागणी केली होती. त्यानंतर ४०० हून अधिक जागा वेकोलि प्रशासनाच्या वतीने काढण्यात आल्या. त्यामूळे आता पुन्हा एकदा आजवर चालत आलेल्या बाहेरील कामगारांना पूरक अशा रोजगाराच्या निकषांविरोधात लढा उभारावा लागणार असून यात चंद्रपूकरांचेही योगदान लागणार असल्याचे आमदार जोरगेवार म्हणाले. आजचा यंग चांदा ब्रिगेडचा मोर्चा वेकोलि प्रशासनाच्या भूमिपुत्रांच्या विरोधातील धोरणाविरोधात व स्थानिकांच्या सन्मानासाठी काढण्यात आला. यंग चांदा ब्रिगेड नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच पुढाकार घेणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले. यापुढे बेईमानी, अन्याय खपवून घेणार नाही. येथील भूमिपुत्रांना रोजगार देणार नसाल तर येथे कामही करू देणार नाही. याचा परिणाम कोळसा उत्पादनावर झाला तर त्याची जबाबदारी वेकोलि प्रशासनाचीच असेल, असेही आमदार जोरगेवारांनी ठणकावले. 

मोर्चात बेरोजगारीमुळे युवकांवर ओढवलेल्या संकटावर आधारीत प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करण्यात आले होते. मोर्चात हजारोंच्या संख्येने भूमिपुत्र सहभागी झाले होते. मोर्चा जिल्हाधिकारी  
कार्यालयावर पोहोचल्यानंतर एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख