राज्याचे वनमंत्री संजय राठोड पोहरादेवीला परिवारासह दर्शनास येणार...

८ फेब्रुवारीनंतर मंत्री राठोड पहिल्यांदाच दिसणार आहेत. पण ते खरोखरच उद्या येणार की नाही, याबाबत विविध तर्क लावले जात आहे. जर आले तर उद्या ते काय बोलतील किंवा माध्यमांसमोर येणार की नाही, याबाबतही अनिश्‍चितता आहे.
Sanjay Rathore
Sanjay Rathore

दिग्रस (जि. यवतमाळ) : आज अख्या महाराष्ट्राला पडलेला प्रश्न म्हणजे वनमंत्री संजय राठोड हे माध्यमांसमोर किंवा लोकांसमोर केव्हा येणार? पूजा चव्हाण नामक तरुणीच्या मृत्यूनंतर आजतागायत ते समोर आलेले नाहीत. यादरम्यान विरोधी पक्षाने त्यांच्यावर विविध आरोप केले. ते उद्या दुपारी १ वाजता वाशीम जिल्ह्याच्या पोहरादेवी येथे दुपारी १ वाजता येणार असल्याची माहिती पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी दिली आहे.

दिग्रस पासून ९ किलोमीटर अंतरावर बंजारा समाजाची काशी पोहरादेवी येथे मंत्री राठोड गुरुवारी १८ फेब्रुवारीला येणार, अशी माहितीही सुनील महाराजांनीच दिली होती. तेव्हा राज्याचे लक्ष पोहरादेवीकडे केंद्रित झाले होते. शासकीय यंत्रणासुध्दा सज्ज झाली होती. परंतु अगदी वेळेवर १८ फेब्रुवारी तारीख रद्द करण्यात आली आणि लगेच दोन दिवसांनंतर महंत सुनील महाराज यांनी मंगळवार, २३ फेब्रुवारी ही तारीख जाहीर केली. मंत्री राठोड हे आपल्या परिवारासह दुपारी १ वाजता पोहरादेवीला येतील. येथील संत सेवालाल महाराज, संत बाबनलाल महाराज व श्री जगदंबा मातेचे दर्शन घेणार असल्याचे महंत सुनील महाराज यांनी आज ‘सरकारनामा’ला सांगितले. 

प्रशासकीय यंत्रणेकडून किंवा संजय राठोड यांच्या खाजगी जनसंपर्क विभागाकडून पोहरादेवीला कार्यक्रम असल्याचे कुठल्याच प्रकारे जाहीर करण्यात आलेले नाही, हे येथे उल्लेखनीय. परंतु मानोरा पोलीस ठाण्याकडून मात्र येथील संस्थेला कलम १४९ जा.फौ. प्रमाणे नोटीस बजावण्यात आली आहे. ५० पेक्षा जास्त लोकांची गर्दी होऊ नये, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे नोटीसमध्ये बजावण्यात आले आहे. विशेष म्हणजे पोहरादेवी मंदिर परिसरात कोणत्याही प्रकारचा सभामंडप किंवा सभागृह निश्चित नसल्याने संजय राठोड हे फक्त दर्शनासाठी येतील व निघून जातील, असे बोलले जात आहे.

महंत सुनील महाराजांनी यांनी यापूर्वी मंत्री संजय राठोड १८ फेब्रुवारीला येणार असल्याचे सांगितले होते. पण त्यावेळी ते आले नाहीत. यावेळी त्यांनी ते उद्या येणार असल्याचे सांगितले आहे. उद्या ते कोरोनाचा आढावा घेणार असल्याचेही जिल्ह्यात कुठे कुठे बोलले जात आहे. पण शासकीय स्तरावर तशी कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. ८ फेब्रुवारीनंतर मंत्री राठोड पहिल्यांदाच दिसणार आहेत. पण ते खरोखरच उद्या येणार की नाही, याबाबत विविध तर्क लावले जात आहे. जर आले तर उद्या ते काय बोलतील किंवा माध्यमांसमोर येणार की नाही, याबाबतही अनिश्‍चितता आहे. ते काहीही असो पण उपराजधानीतून माध्यमांच्या प्रतिनिधींनी आजच पोहरादेवीत तळ ठोकल्याची माहिती आहे. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com