झेडपीच्या अर्थसंकल्पीय सभेपूर्वी करावी लागणार गटनेत्यांची निवड... - the selection of the group leaders have to be done before the budget meeting of zp | Politics Marathi News - Sarkarnama

झेडपीच्या अर्थसंकल्पीय सभेपूर्वी करावी लागणार गटनेत्यांची निवड...

निलेश डोये 
शुक्रवार, 12 मार्च 2021

जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सभेपूर्वी पक्षाकडून सदस्यांसाठी काढण्यात येणारे व्हीप गटनेत्यांच्या नावे काढण्यात येते. त्यामुळे सभेच्या आधीच गटनेत्यांची नियुक्ती किंवा तात्पुरती नियुक्ती करावी लागणार असल्याची चर्चा आहे. या पदासाठी सर्वच पक्षांत अनेक जण उत्सुक असल्याचे सांगण्यात येते.

नागपूर : १६ मार्चला जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सभा आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे जिल्हा परिषदेमधील ओबीसी वर्गातील १६ सदस्यांचे पद रिक्त झाले. या सभेपूर्वी तिन्ही प्रमुख पक्षांना गटनेत्यांची नियुक्ती करावी लागणार आहे. रिक्त झालेल्या पदांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजप या तीनही पक्षांच्या गटनेत्यांचा समावेश आहे. त्यामुळे त्यांच्या जागी कुणाची वर्णी लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनेक जण पदासाठी इच्छुक असल्याचे सांगण्यात येते. 

जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सभेपूर्वी पक्षाकडून सदस्यांसाठी काढण्यात येणारे व्हीप गटनेत्यांच्या नावे काढण्यात येते. त्यामुळे सभेच्या आधीच गटनेत्यांची नियुक्ती किंवा तात्पुरती नियुक्ती करावी लागणार असल्याची चर्चा आहे. या पदासाठी सर्वच पक्षांत अनेक जण उत्सुक असल्याचे सांगण्यात येते. काँग्रेसमध्ये ज्येष्ठ सदस्य म्हणून नाना कंभाले व शांता कुमरे यांचे नाव आघाडीवर आहे. उपाध्यक्षपद मनोहर कुंभारे यांच्याकडे देण्यात आले असताना गटनेतेपदही त्यांच्याकडे होते. महत्त्वाचे पद न मिळाल्याने नाना कंभाले नाराज असल्याची चर्चा होती. उपाध्यक्षपदासाठी ते इच्छुक असल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे, ते मंत्री केदार गटाचे नसल्याचे सांगण्यात येते. 

शांता कुमरे यासुद्धा ज्येष्ठ आहेत. असे असताना कोणत्याही प्रकारचे पद न मिळाल्याने त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसकडून गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख व माजी मंत्री बंग यांचे पुत्र दिनेश बंग यांच्यापैकी एकाची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. चंद्रशेखर कोल्हे हे देशमुख गटाचे आहेत. भाजपचे गटनेते अनिल निधान यांनाही न्यायालयाच्या निर्णयाचा फटका बसला आहे. भाजपकडून कैलास बरबटे, सुभाष गुजरकर, व्यंकट कारेमोरे यांच्या नावावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ज्यांचे सदस्यपद गेले त्या जिल्हा परिषद सदस्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला, पण त्यावर अद्याप तरी काहीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे सध्या ४२ सदस्यांमध्येच अर्थसंकल्पीय सभा आटोपावी लागणार असल्याचे सांगण्यात येते. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख