घोटाळ्यांनी वादळी ठरली शिक्षण समितीची सभा, ‘सोलर’ची होणार चौकशी - scams have turn into storm in education committee meeting solar to be probed | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

घोटाळ्यांनी वादळी ठरली शिक्षण समितीची सभा, ‘सोलर’ची होणार चौकशी

निलेश डोये
शनिवार, 13 मार्च 2021

जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण योजनेतून पॉलिमर गणवेश खरेदीसाठी निधी मिळाला. या करता निविदाही काढण्यात आल्या. परंतु हा विषय समितीसमोर ठेवण्यात आला नाही. सभापतींच्या सूचनेवरून निविदा काढण्यात आल्याचे विभागाकडून स्पष्ट करण्यात आल्याचे समजते.

नागपूर : सरकारी कार्यालयांमध्ये भ्रष्टाचार हा सिस्टीमचा एक भाग आहे की काय, अस वाटण्याजोगी परिस्थिती झालेली आहे. मागे पोलिस महासंचालकांनी नागपुरात तसे वक्तव्यही केले होते. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात बरेच घोटाळे झाल्याचा आरोप करीत सदस्यांनी सभापती भारती पाटील यांना धारेवर धरले. शाळांमध्ये लावण्यात आलेल्या सोलर पॅनल व विद्यार्थ्यांना देण्यात आलेले गणवेश निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारी सदस्यांनी केल्या. सदस्यांचा आक्रोश लक्षात त्यांनी या प्रकरणी चौकशी करण्याचे निर्देश दिले. 

तत्कालीन पालकमंत्र्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळांना वीज बिलाच्या कटकटीपासून मुक्ती मिळवून देण्यासाठी सोलर लावण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी जिल्हा नियोजन व खनिज प्रतिष्ठानातून निधी उपलब्ध करून दिला. पहिल्या टप्प्यात २८७ शाळांवर सोलर लावण्यात आले आहे. त्याचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून २० टक्के काम शिल्लक आहे. बैठकीत प्रकाश खापरे व दुधाराम सव्वालाखे यांच्यासह इतर सदस्यांनी शिक्षण समितीच्या बैठकीत सोलरच्या बाबतीत तक्रारी केल्या. जिल्हा नियोजन समितीकडून पहिल्या टप्प्यात २८७ शाळांवर सोलर लावण्यात येत आहे. त्यासाठी ४ कोटी ८० लक्ष रुपये खर्च येणार आहे. महाऊर्जाकडे हा निधी हस्तांतरित करण्यात आला आहे. 

पहिल्या टप्प्यातील शाळांवर सोलर पॅनल लागलेले आहे. हे पॅनल खराब असून निकृष्ट दर्जाचे आहेत. त्याची चौकशी तांत्रिक अधिकाऱ्यांकडून करण्याची मागणी त्यांनी केली. प्रथम सभापती पाटील यांनी टाळण्याचा प्रयत्न केला. परंतु सदस्यांच्या आक्रमकतेमुळे त्यांना चौकशी करण्याचे निर्देश द्यावे लागले. विद्यार्थ्यांना देण्यात आलेले गणवेशही निकृष्ट दर्जाचे असून यात घोटाळा असल्याची तक्रार सव्वालाखे यांनी केली. एकाच कंत्राटदाराकडून त्याची खरेदी करण्याचा आल्याचा आरोप त्यांनी लावला. 

पॉलिमर गणवेशाबाबत समिती अनभिज्ञ 
जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण योजनेतून पॉलिमर गणवेश खरेदीसाठी निधी मिळाला. या करता निविदाही काढण्यात आल्या. परंतु हा विषय समितीसमोर ठेवण्यात आला नाही. सभापतींच्या सूचनेवरून निविदा काढण्यात आल्याचे विभागाकडून स्पष्ट करण्यात आल्याचे समजते.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख