संजय राठोड दोन दिवसांनी ‘या’ ठिकाणी प्रगटणार? - sanjay rathor will appear in this place in two days | Politics Marathi News - Sarkarnama

संजय राठोड दोन दिवसांनी ‘या’ ठिकाणी प्रगटणार?

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 15 फेब्रुवारी 2021

कुठे आहेत संजय राठोड, हा प्रश्न राज्यभर किंबहुना देशभर विचारला जातोय. काही माध्यमांवर यावर चर्चा घेतली जातेय. कुणी सांगतोय की, ते मुंबईला आहेत. तर कुणी म्हणतो राज्याच्या बाहेर आहे. सध्या ते कुठेही असोत, पण दोन दिवसांनी ते पोहरा देवी येथे येणार आहेत. 

नागपूर : राज्याचे वनमंत्री आणि यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड कुठे आहेत, कुठे आहेत संजय राठोड, हा प्रश्न राज्यभर किंबहुना देशभर विचारला जातोय. काही माध्यमांवर यावर चर्चा घेतली जातेय. कुणी सांगतोय की, ते मुंबईला आहेत. तर कुणी म्हणतो राज्याच्या बाहेर आहे. सध्या ते कुठेही असोत, पण दोन दिवसांनी ते पोहरा देवी येथे येणार असल्याची माहिती ‘सरकारनामा’ला प्राप्त झाली. 

पोहरा देवी हे वाशीम जिल्ह्याच्या मानोरा तालुक्यातील गाव आहे. बंजारा समाजाचे दैवत संत सेवालाल महाराजांचे मोठे मंदिर येथे आहे. बंजारा समाजाची काशी म्हणून पोहरा देवीची ओळख देशभर आहे. दरवर्षी एप्रिल महिन्यात येथे मोठी यात्रा भरते. संजय राठोड दोन दिवसांनी येथे येऊन समाजबांधवांशी संवाद साधणार असल्याचे सांगितले जात आहे. बंजारा समाजबांधवांसाठी संजय राठोड हे राष्ट्रीय नेते आहेत आणि त्यांची राजकीय कारकिर्द संपवण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात आहे. त्यामुळे देशभरातील बंजारा समाजबांधव त्यांच्या सोबत आहेत, असा संदेश पोहरादेवीतून दिला जाणार असल्याचेही सूत्र सांगतात. 

दरम्यान मृत पूजा चव्हाणच्या वडिलांनीही व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमधील आवाज पूजाचा नसल्याचे म्हटले आहे. तिने आर्थिक चणचणीतून हे पाऊल उचलल्याचेही त्यांनी म्हटले. यापूर्वी त्यांनी म्हटले होते की, पूजा सोरायसीस या आजाराने ग्रस्त होती. सतत आजारी राहायची. त्यामुळे तिने आत्महत्येसारखे पाऊल उचलले. मृतकाच्या वडिलांचे स्टेटमेंट असे वारंवार बदलत असल्यामुळे आता लवकरात लवकर या प्रकरणाती सत्य बाहेर यावे, अशी अपेक्षा व्यक्त होतेय.  
Edited By : Atul Mehere 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख